पिंपरी: गुंडगिरी आणि अवैध शस्त्रबाळगणाऱ्यांविरुद्ध पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने केलेल्या तडाखेबंद कारवाईत पाच सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे, सांगवी, आणि चाकण या ठिकाणी या कारवाया झाल्या.
तळेगाव दाभाडे परिसरात गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ माजली होती. या घटनेत मुख्य आरोपी विकी खराडे, जो टोळी प्रमुख असल्याचा संशय होता, याचा ठावठिकाणा लागत नव्हता. मात्र, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने कसून तपास करून विवेक उर्फ विकी खराडे (वय 20) आणि पांडुरंग उर्फ पांडा कांबळे (वय 24, दोघेही रा. कामाठीपुरा, ता. शिरूर, जि. पुणे) यांना नवी मुंबईतून अटक केली. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
या कारवाईच्या दरम्यान, प्रियदर्शनीनगर ते ममतानगर रोडवरील जुनी सांगवी येथील रोहित दुर्गेश धर्माधिकारी (वय 22) आणि अनिकेत सतीश काजवे (वय 28) यांना देखील अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख 44 हजार रुपयांची दुचाकी, दोन गावठी पिस्तूल, आणि आठ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
तिसऱ्या कारवाईत, चाकण पोलीस ठाण्यातील 2019 मधील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या तुषार उर्फ गोल्या राठोड (वय 26, रा. आळंदी) याला महाळुंगे एमआयडीसी चाकण येथून ताब्यात घेण्यात आले.
या यशस्वी कारवायांचे श्रेय पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त डॉ. वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त विशाल हिरे यांच्या नेतृत्वाखालील गुंडाविरोधी पथकाच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना जाते. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, उपनिरीक्षक अशोक जगताप, हजरत पठाण, पोलीस अंमलदार प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभीरे, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, शुभम कदम, रामदास मोहिते, तौसीफ शेख, तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी आणि पोपट हुलगे यांच्या प्रयत्नांमुळे ही कारवाई यशस्वी झाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: