झूलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियामध्ये केली नोंद
दिलीप शिंदे
सोयगाव : पर्यावरण संवर्धन व संशोधन क्षेत्रात कार्य करणारे सिल्लोड येथील डॉ.संतोष पाटील यांना आपल्या मूळ गावी भावकितील दीपक रायबा चौधरी पाटील यांच्या शेतात नुकतीच दुर्मिळ असणारी व पर्यावरणात अन्नसाखळीत महत्वाचा घटक असलेली "सरटोडॅक्टस वरदगिरी" ज्यास बेंड टो जीगोस किंवा फॉरेस्ट ग्रे जीकोस असे ही म्हणतात ती आढळली आहे. जमिनीवर पडलेल्या वाळलेल्या पाला पाचोळ्यात निपचित पडलेली ही पाल त्यांच्या निदर्शनास आली.सदर प्रजाती चा रंग मातकट व मातीशी साधर्म्य राखणारा असल्याने नैसर्गिक शत्रूस व भक्षास ती सहज दिसत नाही, यास "कॅमोफ्लागिंग" संबोधले जाते व ही शितरक्ताची प्रजाती खान्देशच्या उष्ण भागात तग धरून आहे ही गोष्ट जैवविविधतेच्या दृष्टीने महत्वाची आहे व सदर पाल ही मातीच्या भेगात,पाला पाचोळा या खाली अधिवासास प्राधान्य देते व या पाली बहुधा निशाचर असतात असे डॉ.पाटील यांनी स्पष्ट केले.डॉ पाटील यांनी या आधी ही भोकरदन जवळील आव्हाना शिवारात "जीकोनेला डेक्कनसिस " नावाच्या पालीच्या प्रजातींची नोंद केली आहे.दोन्ही प्रजातींची केंद्र सरकारच्या जैवविविधता संबंधित झेड. एस. आय .या संस्थेत नोंद करण्यात आली आहे.
काय आहे या दुर्मिळ प्रजातीची वैशिष्ट्यपूर्ण शरीररचना
पाठीवर मोठे गोलाकार तपकिरी काळया ठिपक्यांच्या ६ जोड्या , पोट व पाठ जेथे जोडले जाते त्यावर ठिपक्यांची ओळ, लांबी ९ ते १२ से.मी. लांब , शेपटी लांब, डोके हे मानेपासून वेगळे उठून दिसणारे (डिसटिंक्ट हेड), पायाचे बोट जास्त पसरट व पंजा खाली वाकलेला ( म्हणून बेंड टो) रंग हलका तपकिरी राखाडी व त्यावर काळसर तपकिरी ठिपके, डोळे मोठे.
पर्यावरणात भूमिका
शेतीचे नुकसान करणाऱ्या गोगलगायीची लहान पिल्ले,मुंग्या, कीटक, तुडतुडे हे मुख्य खाद्य. कवचधारी गोगलगायी सेवनाने त्यांना कॅल्शियम मिळते जे अंगावरील सूक्ष्म खवले युक्त त्वचा निर्माण होण्यास मदत होते. नैसर्गिक शत्रू- साप, मोठे पक्षी
ही प्रजाती स्क्वॅमाटा( squamata ) गणातील व गेकोनिडा या फॅमिलीतील असून शीतरक्ताची म्हणजे त्यांच्या शरीरातील तापमान वातावरणातील तपमानानुसार बदलते.वेगळा जीव दिसल्यावर त्यास मारण्याची मानवी प्रवृत्ती असते. असे न करता जैवविविधते मधील दुर्मिळ असलेले हे सजीव जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे-
- डॉ.संतोष पाटील, अभिनव प्रतिष्ठान,सिल्लोड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: