आमदार पी.एन. पाटील सडोलीकर यांचे निधन

 


मुंबई : करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि काँग्रेसचे  प्रदेश उपाध्यक्ष  पी. एन. पाटील सडोलीकर यांचे आज पहाटे सुमारास खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते.

१९ मे रोजी ते घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडले. यात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

१९९९ साली पाटील काँगेसचे जिल्हाध्यक्ष झाले. तेव्हापासून ते काँग्रेसबरोबर राहिले.गांधी घराण्याचे विश्वासू आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.

पी.एन. पाटील हे पहिल्यांदा २००४ साली आमदार झाले होते. त्यानंतर २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.कॉंग्रेसने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी दिली असता ते या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले होते.


सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड;  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली 

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कोल्हापूरमधील काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांच्या जाण्याने एक सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक असल्याचे मत व्यक्त करत त्यांनी पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

कोल्हापूर शहरात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या कामाच्या बळावर त्यांनी जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. एक सजग नेतृत्व, धडाडीचा लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रश्नांची उत्तम जाण आणि ते सोडवण्यासाठी ते सदोदित आग्रही असायचे. शेतकऱ्यांचे प्रश्न, पुनर्वसनाचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, मागासवर्गीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा सतत माझ्याकडे पाठपुरावा सुरू असायचा. त्यांच्या जाण्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सामजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. 

कालच मला त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले होते. त्यानंतर मी तातडीने आधार रुग्णालयाचे डॉक्टर उल्हास दामले आणि डॉ. अजय केणी यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा राहुल पाटील याच्याशी बोलून त्याला पाटील यांची प्रकृती जरा स्थिर झाल्यास त्याना एअर ऍम्ब्युलन्सने मुंबईला आणून त्यांच्यावर उपचार करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळल्याचे वेदनादायक वृत्त मला समजले. 

मी आणि माझा संपुर्ण शिवसेना परिवार  पी. एन. पाटील यांच्या कुटूंबियांच्या, सहकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतल्या या सहृदयी नेतृत्वाला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली.


जनतेशी घट्ट नाळ जुळलेला कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार पी.एन. पाटील यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. कोल्हापूरच्या जनतेशी एकरुप झालेले नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती.  त्यांच्या निधनाने जनतेशी घट्ट नाळ जुळलेले नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

त्यांच्या जाण्याने कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दिवंगत पी. एन. पाटील यांचे कुटुंबिय, सहकारी, कार्यकर्त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.


आमदार पी.एन. पाटील सडोलीकर यांचे निधन आमदार पी.एन. पाटील सडोलीकर यांचे निधन Reviewed by ANN news network on ५/२३/२०२४ ०१:२६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".