मुंबई : अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार(२८ ता)होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती.राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे म्हणून २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान, आदींचा समावेश होता.
अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन २९ सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गणेश विसर्जन मिरवणुका शिस्तबद्धपणे, शांततेत पार पाडाव्यात
अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला आपण मनोभावे निरोप देऊ. विसर्जन मिरवणुकीतही नेहमीप्रमाणे शिस्त पाळावी आणि शांतता, सद्भावनेच्या वातावरणात गणेश विसर्जन पार पाडावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गणेशभक्तांना केले आहे.
Reviewed by ANN news network
on
९/२७/२०२३ ०४:३८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: