चिखलीतील पाणीपुरवठ्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिली १५ ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन

 


राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची माहिती 

भोसरी - चिखली परिसर महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून मूलभूत सुविधांपासून वंचित होता. येथील समस्यांबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा केला आणि आता अजित पवार यांनी सूचना दिल्यानंतर येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत चिखली येथील पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येईल. जल शुद्धीकरण केंद्रापासून पंपिंगद्वारे जलवाहिन्यांमधून पाणी टाक्यांपर्यंत नेले जाईल असे आश्वासन आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहे. यामुळे चिखलीतील तब्बल दोन लाख नागरिकांना पाणीटंचाईपासून मोठा दिलासा मिळाला आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची माहिती दिली. 

पिंपरी चिंचवड शहरातील चिखली हा भाग मोठ्या झपाट्याने वाढला. मात्र त्या तुलनेत मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवत असल्याने येथील ग्रामस्थांनी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर प्रश्नांची जंत्रीच सादर केली. यांनतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांनी बैठक घेतली . या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे ,सामाजिक कार्यकर्ते विकास साने,विकास साने, सुभाष मोरे, काळुराम यादव, सदाशिव नेवाळे, अमृत सोनावणे, नवीन बग, गणेश यादव हे नागरिक व पालिका आयुक्त शेखर सिंह,  पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे  उपस्थित होते.

अजित गव्हाणे म्हणाले, चिखली येथील मुख्यत्वे पाणी प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. चिखली पाटीलनगर येथे महापालिकेने जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. यामध्ये पंपिंगची सुविधा करून येथून चिखली भागासाठी पाईपलाईन द्वारे थेट टाक्यांपर्यंत पाणी पोहोचवले जावे आणि या भागाला पाणीपुरवठा करावा असे नियोजित आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून केवळ पंप बसवला नाही म्हणून या भागाला पाणीपुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही.  ज्यामुळे सातत्याने या भागाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. याशिवाय चिखली भागातील अनेक रस्त्यांची  कामे  प्रलंबित आहे.  चिखली - सोनवणे वस्ती, चिखली- आकुर्डी,  आकुर्डी ते पाटीलनगर, इंद्रप्रस्थ कार्यालय ते विक्टोरिया सोसायटी अशा महत्त्वाच्या रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. भूसंपादन झालेले असताना केवळ प्रशासकीय कारभारात हे रस्ते होऊ शकलेले नाही. याबाबत आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली.  हे सर्व ऐकून घेतल्यानंतर तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याशी चर्चा केली. रस्ते आणि पाण्याच्या समस्येबाबत नक्की कुठे काय अडले आहे. हे देखील विचारून घेतले तातडीने पाण्याचा प्रश्न निकाली लावा अशा सूचना आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत पंप बसवून टाक्यांपर्यत पाणीपुरवठा झाला पाहिजे असे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.


कोणाचाही फोन येऊ द्या .. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना चिखली, मोशी चौक यांसारख्या भागात वारंवार होणारी वाहतूक कोंडी, चोरी लुटमार यांसारख्या नागरिकांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे अशा सूचना केल्या.  पालिका प्रशासनाने पोलिसांच्या माध्यमातून या भागातील अतिक्रमणे हटवून वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी असे देखील पवार यांनी सांगितले. कोणत्याही नेत्याचा,  पदाधिकाऱ्याचा फोन आला तरी अतिक्रमण कारवाई थांबवायची नाही असे देखील यावेळी पवार यांनी निक्षून सांगितले

चिखली भागातील 800 बेडचे हॉस्पिटल, चिखली शाळा क्रमांक 92 यासाठी क्रीडांगण, पाटीलनगर रस्त्याच्या कामासाठी अडचणीचा ठरत असलेला ट्रान्सफॉर्मर हटवणे आणि अग्निशामक यंत्रणा या प्रस्तावित कामांसाठी वेळेचे नियोजन करा.  वेळेवर ही कामे करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्या. गट क्रमांक 1653 आणि 1654 या गायरान जमिनीवरील आरक्षणे तातडीने विकसित करण्यासाठी यंत्रणा कामाला लावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिल्या आहेत यामुळे चिखली भागातील समस्यांचा पुढील काळात तातडीने निपटारा होणार आहे.


- अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

चिखलीतील पाणीपुरवठ्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिली १५ ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन चिखलीतील पाणीपुरवठ्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिली १५ ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन Reviewed by ANN news network on ९/२७/२०२३ ०३:१०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".