मंदार आपटे
खेड : खेड येथील जगबुडी नदीतील गाळ न काढल्यामुळे या वर्षी शहरात पुराचे पाणी शिरण्याची शक्यता नागरिक आणि व्यापारीवर्गाला वाटत आहे.उद्धवसेनेच्या पदाधिका-यांनी प्रांताधिका-यांना याबाबत निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने १ जून रोजी उद्धवसेनेचे कार्यकर्ते जगबुडीनदीतील पाण्यात उतरून आंदोलन करणार आहेत.
माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन १ जून रोजी सकाळी ९ वाजता केले जाणार आहे. अनेक कार्यकर्ते यामध्ये भाग घेणार आहेत. हा विषय नागरिकांच्या हिताचा असल्याने विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, नागरिक आणि व्यापा-यांनी आंदोलनात सक्रीय भाग घ्यावा असे आवाहन उद्धवसेनेचे खेड शहरप्रमुख दर्शन महाजन यांनी केले आहे.
या बाबत बोलताना महाजन म्हणाले; नदीतील गाळ न काढल्याने लोकांच्या मनात पुराची भीती निर्माण झाली आहे. इतर ठिकाणी जिल्ह्यामधील शहरातील नद्यांचे गाळ काढण्याचे काम सुरू आहे मात्र खेडमध्ये विविध कारणे दिली जात आहेत. सदर गाळ काढणे संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्याप गाळ काढण्यास सुरुवात झालेली नाही तसेच गाळ काढण्याची परवानगी अद्याप प्रशासनाकडून , सरकारकडून देण्यात आलेली नाही. प्रशासनासह सत्ताधा-यांना जाग यावी म्हणून आम्ही आंदोलन करणार आहोत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: