पुणे : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवडमार्फत खासगी चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या 'केएस' या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन सुरू होणाऱ्या मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक विहित शुल्क भरुन हवा असल्यास त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) ९ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० दरम्यान कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करणे आवश्यक राहील.
एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी १० मार्च २०२३ रोजी कार्यालयीन सूचनाफलकावर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांनी लिलावासाठी जास्त रक्कमेचा एकच धनाकर्ष (डीडी) १० मार्च २०२३ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात घालून कार्यालयात जमा करावा. धनाकर्ष ‘डीवाय. आर.टी.ओ. पिंपरी-चिंचवड’ या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने जास्तीत जास्त रकमेचा धनाकर्ष सादर केला असेल त्यास पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेले शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा होईल. प्रदान केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही. आकर्षक क्रमांकाचे शुल्क बदल झाल्यास त्यावेळी विहीत करण्यात आलेले शुल्क लागु राहील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी-चिंचवड यांनी कळविले आहे.
Reviewed by ANN news network
on
३/०९/२०२३ ०३:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: