विधानपरिषद लक्षवेधी : विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७५० कोटींची मदत : मंत्री उदय सामंत

 


विदर्भातील शेती आणि फळपीकांसाठी ३ हजार १०३ कोटींची नुकसान भरपाई वितरित

नागपूर : विदर्भातील सतत पडणाऱ्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाने पहिल्यांदाच ७५० कोटी रुपयांची मदत दिल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

      विदर्भातील अतिवृष्टीबाधित संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत सदस्य अमोल मिटकरी यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्याला उत्तर देतांना मंत्री श्री. सामंत बोलत होते.

      मंत्री श्री. सामंत म्हणाले की, अमरावती विभागात संत्री फळपिकाचे कोळशी या रोगामुळे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले नाही. तथापि, नागपूर जिल्ह्यात संत्री पिकावर २ हजार ८८२ हेक्टर आणि मोसंबी पिकावर २७० हेक्टर क्षेत्र अशा एकूण ३ हजार १५२ हेक्टर क्षेत्रावर कोळशी रोग्याचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. हा प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या खाली आहे. हॅार्टसॅप योजनेंतर्गत कीड सर्वेक्षण व कीड नियंत्रक यांच्यामार्फत सर्वेक्षण व जनजागृती केली. या सर्वेक्षणामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील किंवा सर्वेक्षणापासून वंचित राहिलेल्या ठिकाणी पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या जातील. विदर्भातील शेती आणि फळपीकांच्या बाधितक्षेत्रासाठी ३ हजार १०३ कोटी रूपयांची नुकसान भरपाई राज्य शासनाकडून वितरित करण्यात आली असल्याची माहितीही मंत्री श्री. सामंत यांनी उत्तरात दिली.

      विदर्भातील अमरावती व नागपूर विभागातील संत्रा व मोसंबी उत्पादकांमध्ये जणजागृती करण्यासाठी मोहीमेला गती देण्यात येईल. फळपिकांवरील औषध फवारणीबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचार- प्रसार करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना दिल्या जातील, असे मंत्री श्री. सामंत यांनी उत्तरात सांगितले.

      पीक विम्याबाबत उपप्रश्नाला उत्तर देतांना मंत्री श्री. सामंत म्हणाले, अमरावतीमध्ये एकूण शेतकऱ्यांची संख्या ९ हजार २७६ असून क्षेत्र ९ हजार २५७ हेक्टर आहे. देय रक्कम ही  १८६१. ३४ लाख रुपये आहे. त्यापैकी ४ हजार ६९७ शेतकऱ्यांना १८५१.३१ कोटी रुपये पीक विम्याचा लाभ मिळाला असल्याची माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

      या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रविण दरेकर, अनिकेत तटकरे, डॉ. रणजित पाटील, प्रविण लटके  यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.


विधानपरिषद लक्षवेधी : विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७५० कोटींची मदत : मंत्री उदय सामंत विधानपरिषद लक्षवेधी : विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७५० कोटींची मदत  : मंत्री उदय सामंत Reviewed by ANN news network on १२/२२/२०२२ ०८:४३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".