अस्वल किड्यांचा (सुरवंटांचा) प्रादुर्भाव वाढल्याने मोहननगर व महात्मा फुलेनगर परिसरातील नागरिक त्रस्त
माजी नगरसेवक मारुती भापकर यांचे पालिका आयुक्तांना पत्र; तात्काळ चौकशीची मागणी
मागील वर्षी परिणामकारक ठरलेली पावडर यंदा कुचकामी ठरल्याचा दावा
चिंचवड, (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने निकृष्ट दर्जाची 'बीसी पावडर' खरेदी केल्याचा आरोप करत शहरातील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांना पत्र लिहिले आहे. या निकृष्ट पावडरमुळे अस्वल किड्यांचा (सुरवंटांचा) प्रादुर्भाव वाढत असून, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे भापकर यांनी पत्रात म्हटले आहे.
मोहननगर आणि महात्मा फुलेनगर परिसरातील उंबर, पिंपळ, वड आणि बाभूळ यांसारख्या झाडांवर मोठ्या प्रमाणात अस्वल किडे तयार होत आहेत. हे किडे लहान मुले, महिला आणि नागरिकांच्या अंगावर पडून त्वचेला संसर्ग, लालसरपणा आणि खाज येण्यासारख्या समस्या निर्माण करत आहेत.
पत्रात भापकर यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षी याच भागातील समस्येवर चांगल्या दर्जाच्या बीसी पावडरच्या फवारणीने नियंत्रण मिळवले होते. मात्र, यावर्षी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी तीन ते चार वेळा ही पावडर फवारूनही कोणताही परिणाम दिसून आलेला नाही. या पावडरला वास येत नसून, ती कुचकामी ठरत आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
या गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दर्जेदार औषधांची फवारणी आणि चांगल्या प्रतीची बीसी पावडर वापरून अस्वल किड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी भापकर यांनी केली आहे.
PCMC
Health Hazard
Maruti Bhapkar
Chinchwad
BC Powder
#PCMC #PimpriChinchwad #HealthHazard #MarutiBhapkar #Chinchwad #HealthNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: