भारतीय मजदूर संघाचे पुण्यात आंदोलन, कामगारांना न्याय देण्याची मागणी
शासनाने किमान वेतन कायद्याच्या तत्वांचा भंग केल्याचा आरोप
उरण, दि. ५ ऑगस्ट २०२५: राज्य सरकारने जुलै ते डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी जाहीर केलेल्या महागाई भत्त्यात (VDA) शून्य रुपयांची वाढ केल्याच्या निर्णयामुळे भारतीय मजदूर संघ (BMS) आणि त्यांच्या संलग्न औद्योगिक संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. हा निर्णय लाखो कामगारांवर अन्याय करणारा असून, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अत्यंत असंवेदनशील असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
जीवनावश्यक वस्तू, घरभाडे आणि प्रवास खर्च सातत्याने वाढत असताना महागाई भत्त्यात वाढ न करणे हे किमान वेतन कायद्याच्या तत्त्वांना हरताळ फासण्यासारखे आहे, असे भारतीय मजदूर संघाचे म्हणणे आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करून कामगारांना न्याय मिळावा, अशी मागणी करत भारतीय मजदूर संघ पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण आणि सचिव सागर पवार यांनी पुणे येथील कामगार कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी कामगार उपायुक्त निखिल वाळके यांनी निवेदन स्वीकारले आणि ते कामगार आयुक्त कार्यालय, मुंबई येथे पाठवण्याचे आश्वासन दिले.
या आंदोलनात रायगड जिल्ह्यातील शेकडो कामगार सहभागी झाले होते. भारतीय मजदूर संघाच्या प्रमुख मागण्यांमध्ये, ४ ऑगस्ट २०२५ रोजीचा महागाई भत्ता आदेश तात्काळ रद्द करून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २ टक्के महागाई भत्ता औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना लागू करावा, महागाई निर्देशांकाच्या आधारे योग्य वाढ जाहीर करावी आणि भविष्यात महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी कामगार प्रतिनिधींना समाविष्ट करून त्रिपक्षीय समिती स्थापन करावी या मागण्यांचा समावेश आहे. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर लोकशाही मार्गाने राज्यभरातील कामगार कार्यालयांसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी दिला आहे.
Indian Mazdoor Sangh, BMS, VDA, Dearness Allowance, Protest, Labor Union, Raigad, Pune.
#BMS #VDA #DearnessAllowance #LaborProtest #IndianMazdoorSangh #Pune #Raigad #GovernmentDecision

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: