पुणे, दि. ४ जुलै २०२५: संपूर्ण विश्वात आपला भारत देश प्रत्येक क्षेत्रात पुढे राहील, हे आपले जीवन ध्येय असले पाहिजे. यासाठीची प्रेरणा आणि ऊर्जा थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनचरित्रातून मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरातील त्रिशक्ती गेट येथे उभारण्यात आलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
श्री. शाह म्हणाले की, थोरल्या बाजीरावांनी तंजावर ते अफगाणिस्तानपर्यंत आणि अफगाणिस्तान ते बंगालमार्गे कटकपर्यंत एका मोठ्या हिंदवी साम्राज्याची स्थापना केली, जे छत्रपती शिवरायांचे स्वप्न होते.बाजीरावांनी युद्ध नियोजनातील वेग, रणकौशल्य, रणनीती आणि वीर सोबत्यांच्या साथीने अनेक पराभवांना विजयात रुपांतरीत केले. पालखेडच्या विजयाचा अभ्यास बारकाईने केल्यास तो अकल्पनीय होता हे लक्षात येईल. गुलामीचे निशाण आहे तिथे उध्वस्त करून स्वातंत्र्याचा दीप लावण्याचे काम त्यांनी यशस्वीपणे केले. देश-विदेशातील अनेक युद्धकौशल्यातील अभ्यासू सेनानींनी त्यांच्या युद्धकौशल्याविषयी गौरविले आहे.
युद्धनीतीचे काही नियम हे कधीच कालबाह्य होत नाहीत. त्यात व्यूहरचना, वेग, सैन्याची समर्पण भावना, देशभक्ती आणि बलिदान भाव सैन्याला विजय मिळवून देतो. गेल्या पाचशे वर्षांतील या सर्व गुणांचे उत्कृष्ट उदाहरण थोरले बाजीराव पेशवे आहेत. त्यांनी त्यांच्या २० वर्षांच्या काळात मृत्यूपर्यंत लढलेली सर्व ४१ युद्धे जिंकली, असेही गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री यांनी काढले. महान भारताची रचना ही शिवछत्रपतींची प्रेरणा आहे, असे सांगून श्री. शाह म्हणाले, संपूर्ण दक्षिण भारत अनेक शाह्यामुंळे पीडित होता आणि उत्तर भारत मुघल साम्राज्याच्या अधीन होता. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ हिंदवी स्वराज्याची स्थापनाच केली नाही तर युवक, बालक आदींच्या मनावर स्वराज्याचे संस्कार केले. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर धर्मवीर संभाजी महाराज, वीर ताराराणी, धनाजी- संताजी आदी अनेक वीरांनी स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा बाळाजी विश्वनाथ आणि नंतर थोरले बाजीरावांची पेशवा म्हणून नेमणूक केल्यानंतर त्यांनी स्वराज्याची ज्योत तेवत ठेवली. थोरले बाजीराव यांचे स्मारक बनविण्याची सर्वात उचित जागा एनडीएच असेल, कारण येथून येणाऱ्या काळातील देशाच्या तिन्ही सेनादलांचे प्रमुख अधिकारी प्रशिक्षित होऊन बाहेर पडत असतात. येथून बाहेर पडताना श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळा तथा त्यांच्या जीवनकाळाचा अभ्यास करून जेव्हा भविष्यातील सेनानी जातील, तेव्हा भारताच्या सीमांना स्पर्श करण्याचे धाडस कोणी करणार नाही. भविष्यात स्वराज्य टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागल्यास आपली सेना आणि नेतृत्व निश्चित करेल. ऑपरेशन सिंदूर हे याचे उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.
प्रत्येक क्षेत्रात देशाला अग्रेसर ठेवण्याची प्रेरणा थोरले बाजीराव पेशव्यांच्या जीवनचरित्रातून - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
७/०४/२०२५ ०६:०२:०० PM
Rating: 5
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: