तळेगाव दाभाडे, पिंपरी-चिंचवड, जालना आणि मध्यप्रदेशातून आलेल्या गुन्हेगारांचा सहभाग
गुन्हेगारांची पार्श्वभूमी आणि कट पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, अटक केलेल्या सातही गुन्हेगारांची पार्श्वभूमी गंभीर गुन्हेगारीची आहे. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, जाळपोळ, खंडणी, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, लूट आणि वाहनांची तोडफोड करणे असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांनी पोलिसांना दिलेल्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे की, त्यांनी ही शस्त्रे लोकप्रतिनिधी असलेल्या सुनील शेळके यांना मारण्यासाठी आणली होती. हे गुन्हेगार तळेगाव दाभाडे, वडगाव, पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी, जालना आणि मध्य प्रदेश या भागातील आहेत.
लाखो रुपयांचा खर्च कोण उचलतोय? या गुन्हेगारांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, त्यांना पिस्तूल विकत घेण्यासाठी आणि इतर ठिकाणी जाण्या-येण्याचा लाखो रुपयांचा खर्च येतो. पोलिसांनी त्यांच्यावर 'मकोका' (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई केली, परंतु त्यांना दीड वर्षानंतर जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर त्यांना दोन वर्षांसाठी तडीपारही करण्यात आले आहे. मात्र, तडीपार असतानाही काही गुन्हेगार पुणे जिल्ह्यात लपून-छपून येत असल्याचा आरोप आमदार शेळके यांनी केला आहे. 'या गुन्हेगारांच्या मागे एवढा खर्च करून त्यांना अभय देणारी व्यक्ती कोण आहे?' असा सवाल करत आमदार शेळके यांनी सरकारला या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची मागणी केली.
एसआयटी चौकशीची मागणी मान्य या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन, २३ जानेवारी २०२५ रोजी माहिती अधिकारांतर्गत या प्रकरणाची माहिती मागितली असता, ती अद्याप मिळालेली नाही, असेही नमूद करण्यात आले. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे २५ जून २०२३ रोजी तळेगाव येथे दोन व्यक्तींना चार पिस्तूलसह अटक करण्यात आली होती. त्यानंतर २८ जून २०२३ रोजी आणखी तीन व्यक्तींना अटक करून त्यांच्याकडून काडतुसे व पिस्तूल जप्त करण्यात आले. हे गुन्हेगार मध्य प्रदेशातून एका देवराज नावाच्या व्यक्तीकडून पिस्तूल विकत घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, ज्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारला माहिती देण्यात आली आहे आणि त्याच्यावर लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे.
आमदार शेळके यांनी आक्रमकपणे एसआयटी स्थापन करण्याची मागणी लावून धरली. यावर गृहमंत्र्यांनी आश्वासित केले की, या संपूर्ण प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात येईल आणि चौकशी करत असताना जो कोणी मूळ सूत्रधार असेल, तो पकडेपर्यंत कोणतीही हलगर्जीपणा होणार नाही. आमदार शेळके आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही धोका असल्याचे चौकशीत समोर आल्याने, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एसआयटी चौकशीचा निर्णय घेण्यात आला आहे.
State News, Crime, Politics, Investigation, Maharashtra Police
#SunilShelke #AssassinationPlot #SITInvestigation #MaharashtraCrime #PunePolice #MCOCA

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: