पिंपरी चिंचवड : इंद्रापार्क सोसायटीत अवतरली पंढरी; आषाढी एकादशीनिमित्त भव्य पालखी सोहळा उत्साहात (VIDEO)
रावेत-किवळे, दि. ७ जुलै २०२५ (प्रतिनिधी): हातात भगवे ध्वज, टाळ, डोक्यावर छोटे तुळशी वृंदावन घेतलेले संत वेषातील बालगोपाल अन् टाळ-चिपळ्यांच्या गजरात 'ज्ञानोबा तुकाराम'चा गगनभेदी जयघोष! मध्यभागी फुलांनी सजवलेली आकर्षक विठ्ठल-रुक्माईची पालखी आणि पारंपरिक वेशातील सोसायटीतील महिला-पुरुष असे जणू पंढरीच अवतरल्याचा अनुभव आज रावेत-किवळे भागातील इंद्रापार्क सोसायटीमध्ये आला. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर येथे भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
विठ्ठल-रुक्माईच्या मूर्तीचे भक्तिभावाने पूजन करून 'विठ्ठल' जयघोषात पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. फुलांच्या माळांनी संपूर्ण परिसर भक्तिमय आणि आकर्षक सजविण्यात आला होता. फुगडी, पावली खेळत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत बालगोपालांसह सर्व भाविक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
पालखी सोसायटीमधील प्रमुख मार्गाने फिरल्यानंतर महिलांनी भजने आणि अभंग सादर केले, ज्यामुळे वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा संचारली. त्यानंतर भाविकांनी महाआरती करून देवाला वंदन केले आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोसायटीचे पदाधिकारी, सांस्कृतिक समिती आणि महिलांनी विशेष परिश्रम घेतले.
Ashadhi Ekadashi, Palkhi Sohala, Indra Park Society, Ravet-Kiwale, Pimpri Chinchwad, Vitthal Rukmini, Religious Celebration, Community Event, Devotion
#AshadhiEkadashi #PalkhiSohala #IndraParkSociety #PimpriChinchwad #VitthalRukmini #Devotion #CommunityCelebration #Maharashtra #Pune

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: