ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ६० लाखांची फसवणूक; आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद

 


नेपाळी नागरिकांसह चौघांना बेड्या; सायबर फसवणुकीचे मोठे नेटवर्क उद्ध्वस्त

पुणे शहर, (३० जून): पुणे सायबर पोलिसांनी ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करत, बँक खाती आणि सिमकार्ड उपलब्ध करून देणाऱ्या चार प्रमुख सदस्यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे कोट्यवधी रुपयांच्या सायबर फसवणुकीचे एक मोठे नेटवर्क उद्ध्वस्त झाले आहे. पुणे सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ४५/२०२५ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना "TRASHOONYA" नावाच्या कंपनीमार्फत ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. दिव्यांशी अग्रवाल आणि अशोक रेड्डी नावाच्या एजंट्सनी नियमित कॉल आणि व्हॉट्सअॅप चॅटद्वारे संपर्क साधून फिर्यादींना त्यांच्या मोबाईलमध्ये "TRASHOONYA" नावाचे ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. या ॲपद्वारे विविध कंपन्यांचे शेअर्स आणि आयपीओ खरेदी करण्याच्या बहाण्याने फिर्यादींची एकूण ६० लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. हा गुन्हा १९ एप्रिल २०२५ रोजी दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याच्या तपासात फिर्यादींच्या फसवणुकीपैकी १४ लाख ३० हजार रुपयांची रक्कम एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या खात्यावर ट्रान्सफर झाल्याचे निष्पन्न झाले. हे खाते आदियोगी स्क्रॅप ॲड वेस्ट मॅनेजमेंट एलएलपी, शिवणे, पुणे येथील कंपनीचे असल्याचे समोर आले. या कंपनीचा संचालक अनिकेत प्रशांत भाडळे (वय २७, रा. शिवाजीनगर गावठाण, पुणे) याला २२ जून २०२५ रोजी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान अनिकेत भाडळेने त्याचे बँक खाते सिंहगड रोड येथील कार्यालयातून 'आकाश' नावाचा व्यक्ती वापरत असल्याची माहिती दिली.

या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असताना, काही नेपाळी व्यक्ती नन्हे येथील एका हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासणीत, नोरबु शेर्पा (वय २८, रा. गाव टॅप्टींग, जिल्हा सोलुंखुबू, नेपाळ) आणि अंग नुरी शेर्पा (वय २१, रा. जिल्हा ओखलढुंगा, गाव खिजीदेम्बा, नेपाळ) यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाले. तसेच सागर मच्छिंद्र गायकवाड (वय २६, रा. गणेशमळा, सिंहगडरोड, पुणे) आणि शिवतेज अशोकराव गुंजकर (वय ३३, रा. जांभुळवाडी आंबेगाव, पुणे) यांनाही अटक करण्यात आली.

या गुन्ह्यात आत्तापर्यंत १० मोबाईल फोन, १० पेन ड्राईव्ह, १ बँकेचे स्वाईप मशीन, ४ लॅपटॉप, ५३ विविध बँकांचे डेबिट कार्ड, १७४ विविध कंपन्यांचे सिमकार्ड, ५५ विविध बँकांचे चेकबुक, १ सीपीयू, ३९ विविध कंपन्यांचे शिक्के, २ राऊटर, २७ विविध बँकांचे मोकळे चेक, ४ हार्ड डिस्क, ७ सीडी/डीव्हीडी, २७ नग क्यूआर कोड आणि १ डीव्हीआर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ही कामगिरी सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील  निरीक्षक संगीता देवकाते, सहायक फ़ौजदार संदेश कर्णे, अंमलदार प्रविणसिंग राजपूत, राजुदास चव्हाण, अमर बनसोडे, जान्हवी भडेकर, प्रशांत बोऱ्हाडे, बाळासो चव्हाण, नवनाथ कोंढे, सचिन शिंदे, अनिकेत भिंगारे, आदनान शेख, श्रीकृष्ण नागटिळक, अमोल कदम, संदीप पवार, सतीशकुमार मांढरे, संदीप मुंढे, संदीप यादव, कौशल्या भांगिरे आणि नीलम नाईकरे यांनी केली.

Cyber Crime, Financial Fraud, Online Scam, Arrest, Pune Police, International Gang 

 #PuneCyberPolice #OnlineFraud #CyberCrime #FinancialScam #PuneNews #Arrest #TRASHOONYA #ShareTradingScam

ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ६० लाखांची फसवणूक; आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ६० लाखांची फसवणूक; आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद Reviewed by ANN news network on ७/०१/२०२५ ०५:३७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".