पिंपरी चिंचवड : पंतप्रधान मोदींच्या निधनाची खोटी बातमी पसरवणाऱ्यांविरोधात भाजपची तक्रार; कारवाईची मागणी
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल; पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना कारवाईचे निर्देश
पुणे, (२ जुलै): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची खोटी माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर 'akshit_meena_997' या आयडीवरून व्हिडिओद्वारे प्रसारित करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराची पिंपरी चिंचवड शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी तीव्र दखल घेतली असून, संबंधित समाजकंटकाविरुद्ध कठोर फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'akshit_meena_997' या फेसबुक आयडीवरून प्रसारित करण्यात आलेल्या या बनावट व्हिडिओमुळे नागरिकांच्या मनात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे समाजात गैरसमज पसरू नये यासाठी तात्काळ कारवाई होणे आवश्यक असल्याचे सचिन काळभोर यांनी म्हटले आहे.
या संदर्भात सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त पुणे, राज्यपाल आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर तक्रार दाखल केली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून, पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तांना याबाबत लेखी पत्राद्वारे तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे चिटणीस सचिन काळभोर यांनी या प्रकरणी कसून तपास करून दोषींविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी पुन्हा मागणी केली आहे. अशा प्रकारे खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Fake News, PM Modi, Social Media Misinformation, Pune BJP, Cyber Crime, Pimpri Chinchwad Police
#FakeNews #PMModi #SocialMedia #PunePolice #CyberCrime #SachinKalbhor #BJP #Misinformation

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: