एच. ए. प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सवी मेळावा रंगला

१९७५ च्या बालवाडी बॅचने साधला दुग्ध शर्करा योग; नवागतांचेही उत्साहात स्वागत

पुणे: एच. ए. प्राथमिक शाळेत नुकताच १९७५ साली बालवाडीमध्ये प्रवेश घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा एक अनोखा मेळावा शाळेच्या 'रजत भवन' येथे उत्साहात संपन्न झाला. 'सुवर्ण महोत्सवी शाळेतील पहिले पाऊल व नवागतांचे स्वागत' असा दुग्ध शर्करा योग असलेला हा कार्यक्रम माजी विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा जाधव, ज्येष्ठ शिक्षिका अर्चना गोरे, शहनाज हेब्बाळकर, श्यामला दाभाडे आणि धनश्री पवार यांनी औक्षण करून स्वागत केले. विशेष म्हणजे, बालवर्गाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देऊन आपल्या माजी ज्येष्ठांचे आदराने स्वागत केले. या प्रसंगी व्यासपीठावर मोहन बाबर, सुरेंद्र मोरे, मंदा कंद, शीला बडदाळ, उमेश कुलकर्णी, अभय पिंपळीकर, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार तांबे, प्रकाश तेलंगी, सुधीर भोसले, ॲड. मनीषा गवळी आणि सविता पवार यांसह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन आणि ईशस्तवनाने झाली. त्यानंतर स्वागतगीत व बालगीते सादर करण्यात आली. शाळेच्या शिक्षिका समीक्षा ईसवे, अनिता येनगुल, अनघा कडू, सीमा हांगे, रत्नाकर वरवडेकर आणि विठ्ठल मोरे यांनी गायन व वादन करून कार्यक्रमात रंगत भरली. बाहेरगावाहून आलेले अनेक माजी विद्यार्थी, विशेषतः सन १९८७ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेले, बऱ्याच वर्षांनी एकमेकांना भेटल्याने भारावून गेले होते. शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना सर्वजण बालपणीच्या रमणीय क्षणांमध्ये रममाण झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन बाबर यांनी केले, तर मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एकनाथ बुरसे, उपमुख्याध्यापिका आशा माने आणि पर्यवेक्षिका अनिता कदम यांच्या वतीने राजू गायकवाड आणि नायडू सरांनी सन्मान स्वीकारला. माजी विद्यार्थ्यांनी बालवर्गाच्या २०० विद्यार्थ्यांना मण्यांच्या पाट्यांचे वाटप करून आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली, तसेच सर्व मुलांना चॉकलेट्स देण्यात आली.

शैलेश भावसार यांनी गाणी गायली, तर राजेश चिट्टे यांनी मिकी माऊसच्या वेशात नृत्य करून उपस्थितांचे मनोरंजन केले. लहान मुलांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी या गाण्यांचा व नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला. दिलीप कंद, माजी सैनिक सुनील पवार आणि दिनेश मानकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डेक्कन एज्युकेशन संस्था, एच. ए. शाळा, एच. ए. कंपनी, विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका शकुंतला ढवळीकर तसेच शिक्षक, सेवक आणि आया मावशी या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

शाळेची अशीच प्रगती होत राहावी आणि पुन्हा पुन्हा शाळेत भेटण्याची संधी मिळावी, अशा भावना सर्व माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. 'पुन्हा लवकरच भेटूयात' या आश्वासनाने मेळाव्याची सांगता झाली. कार्यक्रमानंतर चहापान व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अजित गुजराथी यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक डॉ. विठ्ठल मोरे यांनी केले.

 Alumni Meet, School Event, Education, Pune, Reunion, Primary School, Nostalgia

 #HAPrimarySchool #AlumniMeet #SchoolReunion #PuneEvents #Education #Nostalgia #GoldenJubilee #Students #SchoolDays

एच. ए. प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सवी मेळावा रंगला एच. ए. प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सवी मेळावा रंगला Reviewed by ANN news network on ७/०१/२०२५ ०५:०७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".