पिंपरी, पुणे: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यालयीन अधीक्षक प्रमोद श्रीकृष्ण सावरकर यांचा मंगळवार, दिनांक १ जुलै रोजी दिशा सोशल फाऊंडेशनतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. सावरकर हे ३० जून २०२५ रोजी सुमारे ३६ वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रशासकीय सेवेनंतर निवृत्त झाले. या दीर्घ कार्यकाळात त्यांनी महापालिकेतील जवळपास सर्वच महत्त्वाच्या विभागांमध्ये मोलाचे योगदान दिले.
निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या वर्षात प्रमोद सावरकर यांनी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळली. सांस्कृतिक जाण आणि या क्षेत्राची पुरेशी माहिती असल्यामुळे त्यांनी वर्षभरात नाट्यगृहात अत्यंत उत्तम कामकाज केले. त्यांच्या व्यवस्थापनाखाली एका वर्षात नाट्यगृहात तब्बल ६१५ कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले, ज्यात १५५ नाटकांचा समावेश होता. नामवंत कलावंतांची अधिकाधिक नाटके तसेच उत्तमातील उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम नाट्यगृहात व्हावेत यासाठी त्यांनी कायम सकारात्मक भूमिका ठेवली.
सावरकर यांच्या प्रयत्नांमुळे केवळ नाट्यगृहाच्या माध्यमातून वर्षभरात महापालिकेला एक कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले. याव्यतिरिक्त, बराच काळ शासनाकडे थकित असलेली २५ लाख रुपयांची रक्कमही त्यांनी अथक पाठपुरावा करून पालिकेला मिळवून दिली. दिशा सोशल फाऊंडेशन असो किंवा शहरातील इतर विविध संस्था, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी त्यांनी नेहमीच सर्वतोपरी मदतीची भूमिका ठेवली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन, दिशा सोशल फाऊंडेशनने मंगळवारी शिवप्रतिमा आणि पुस्तके देऊन प्रमोद सावरकर यांचा गौरव केला.
या सत्कार सोहळ्याला दिशा सोशल फाऊंडेशनचे माजी अध्यक्ष गोरख भालेकर, नाना शिवले, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, उपाध्यक्ष संतोष बाबर, सचिन साठे, राजेश सावंत, नंदकुमार कांबळे, संतोष निंबाळकर आणि शरीफ शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सावरकर यांच्या निस्वार्थ सेवेबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.
Felicitation, Pimpri-Chinchwad, Cultural Management, Retirement, PCMC, Theater, Community Service, Pune
#PramodSawarkar #ChinchwadNatyagruha #PimpriChinchwad #PCMC #Felicitation #CulturalManager #DishaFoundation #Retirement #PuneNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: