'मिशन प्रगती' द्वारे गुन्हे तपासाची माहिती, तर 'मिशन प्रतिसाद' ज्येष्ठ नागरिकांसाठी
रत्नागिरी, (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांसाठी पोलिसांशी संपर्क साधणे आणि त्यांना माहिती मिळणे अधिक सोपे व्हावे, यासाठी तीन महत्त्वाचे नवीन उपक्रम जाहीर केले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली.
१. 'मिशन प्रगती' उपक्रम: फिर्यादीला दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासातील प्रगतीची माहिती वेळोवेळी मिळावी, या उद्देशाने 'मिशन प्रगती' उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या तपासकार्याच्या प्रत्येक टप्प्याची माहिती फिर्यादीला मेसेज किंवा व्हॉट्सअॅपद्वारे कळवली जाईल. ज्या फिर्यादींकडे मोबाईल नसेल, त्यांना ही माहिती पत्राद्वारे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे अधीक्षक बगाटे यांनी सांगितले.
२. 'मिशन प्रतिसाद' उपक्रम (ज्येष्ठ नागरिकांसाठी): ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या तातडीने सोडवण्यासाठी 'मिशन प्रतिसाद' उपक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत ९६८४७०८३१६ आणि ८३९०९२९१०१ हे दोन हेल्पलाइन क्रमांक २४ तास सुरू राहणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी तक्रार नोंदवल्यास पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचून त्यांना आवश्यक ती मदत करणार आहेत. या दोन्ही उपक्रमांच्या अंमलबजावणीवर पोलीस अधीक्षक कार्यालयातून विशेष देखरेख ठेवली जाणार आहे.
३. प्रत्येक पोलीस ठाण्याला स्वतंत्र मोबाईल क्रमांक: सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधणे अधिक सुलभ होण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला स्वतंत्र मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. हे क्रमांक जाहीर करण्यात आले असून, नागरिक आता थेट संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधू शकतील.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी 'आपले सरकार' पोर्टलद्वारे पोलीस विभागाच्या १७ सेवा ऑनलाइन उपलब्ध असल्याची माहिती दिली. या ऑनलाइन सेवांबद्दल नागरिकांमध्ये अद्याप जागरूकता कमी असल्याने ऑनलाइन अर्जांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी या सेवांची माहिती घेऊन घरबसल्याच त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: