रत्नागिरी, दि. १३ : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक हे जगभरातील इतिहासकारांना, अभ्यासकांना आणि संशोधकांना आकर्षित करणारे, प्रेरणा देणारे तसेच ऐतिहासिक माहिती देणारे असावे, अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली. त्यासाठी भव्य-दिव्य आणि देखणे स्मारक झाले पाहिजे आणि त्याचा आराखडा तयार करताना होलोग्राफीचाही वापर व्हावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात काल (१२ जुलै २०२५ रोजी) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाबाबत सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, सुभाष सरदेसाई, राजेंद्र महाडिक, बंड्या साळवी, बाबू म्हाप आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले की, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना मानांकन दिले आहे. याच धर्तीवर या स्मारकाच्या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती असाव्यात. तसेच, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक विस्तृत संग्रहालय तयार करावे. या परिसरातील मंदिरांचेही संवर्धन करण्यावर त्यांनी भर दिला.
ते पुढे म्हणाले की, अत्यंत कल्पकतेने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे स्मारक उभारण्यासाठी त्याचा आराखडा देखील तितकाच प्रभावी तयार करावा. राज्य शासनातर्फे स्मारकासाठी आवश्यक तो सर्व निधी दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. स्मारकामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, असा एक सर्वसमावेशक आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial, Ratnagiri, Dr Uday Samant, Historical Monument, Cultural Heritage
#SambhajiMaharaj #Ratnagiri #Memorial #DrUdaySamant #History

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: