रत्नागिरी, दि. १३ : रत्नागिरी जिल्ह्यात विक्रीसाठी येणारे गोवा बनावटीचे मद्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने पकडावे आणि कोणाचाही राजकीय दबाव न जुमानता, अशा जिल्ह्यातील गोवा बनावट मद्याचे विक्री अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त करावेत, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात काल (१२ जुलै २०२५ रोजी) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी कठोर शब्दात सांगितले की, "गोवा बनावटीच्या मद्याची विक्री जिल्ह्यात जे कोणी करत असेल, त्यांनी स्वतःहून हा गैरप्रकार बंद करावा. अन्यथा, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे अवैध मद्य जिल्ह्यात येण्यापासून रोखण्यासाठी नाकाबंदी करावी आणि भरारी पथकाने तात्काळ धाडी घालाव्यात." गोव्याचे मद्य जिल्ह्यात अजिबात येणार नाही, याची खबरदारी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सतर्क राहून काटेकोरपणे कारवाई करून घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्ह्यातील वाईन शॉप आणि परमिट रुम संघटनेचे पदाधिकारी व सदस्य देखील उपस्थित होते. अवैध दारूविक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने सक्रिय भूमिका घ्यावी, यावर पालकमंत्र्यांनी भर दिला.
Goa Liquor, Illegal Alcohol, Ratnagiri, Dr Uday Samant, Excise Department
#Ratnagiri #GoaLiquor #IllegalAlcohol #UdaySamant #ExciseAction

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: