पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऐतिहासिक कर वसुली; पहिल्या तिमाहीत ५२२ कोटींचा टप्पा पार

 


गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक कर संकलन; ऑनलाइन भरणा आघाडीवर

पिंपरी, १ जुलै २०२५: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीमध्ये, म्हणजेच अवघ्या ९० दिवसांमध्ये, तब्बल ५२२ कोटी ७२ लाख रुपयांचा विक्रमी मालमत्ता कर वसूल केला आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पहिल्या तिमाहीत कर वसुलीने पाचशे कोटींचा आकडा पार करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या यशाबद्दल महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत.

पहिल्या तिमाहीत नागरिकांनी जास्तीतजास्त मालमत्ता कर भरावा, यासाठी कर संकलन विभागाने ३० जून २०२५ पर्यंत विविध सवलती जाहीर केल्या होत्या, ज्यात ऑनलाइन कर भरणाऱ्यांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यात आली होती. या सवलतींना नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. १ एप्रिल २०२५ ते ३० जून २०२५ या तिमाहीत तब्बल ४ लाख १२ हजार मालमत्ताधारकांनी कर भरून या सवलतींचा लाभ घेतला. यामध्ये महिला मालमत्ताधारक, माजी सैनिक, दिव्यांग व्यक्ती, शौर्यपदकधारक आणि पर्यावरणपूरक मालमत्ताधारकांसह मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.

गेल्या पाच आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतील आकडेवारी पाहता, यंदाच्या वर्षी कर संकलनात विक्रमी वाढ दिसून आली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये १७१.८५ कोटी, २०२२-२३ मध्ये २५३.६५ कोटी, २०२३-२४ मध्ये ४५४ कोटी, तर २०२४-२५ मध्ये ४४० कोटी रुपयांची कर वसुली झाली होती. या तुलनेत यंदा ३० जून २०२५ पर्यंत ५२२ कोटी ७२ लाखांची वसुली होऊन नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

या विक्रमी कर संकलनात ऑनलाइन पेमेंटचा मोठा वाटा आहे. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत, ३ लाख २३ हजार २३९ नागरिकांनी तब्बल ३८० कोटींपेक्षा जास्त कर ऑनलाइन पद्धतीने भरला आहे, ही एकूण कर भरणाऱ्यांच्या तुलनेत जवळपास ७३ टक्के आहे. १८ विभागीय कार्यालयांच्या कॅश काऊंटरद्वारे ३० कोटी ६३ लाख, धनादेशाद्वारे २३ कोटी ६६ लाख, तर आरटीजीएसद्वारे २३ कोटी ५३ लाख रुपयांचा कर भरण्यात आला. विशेष म्हणजे, ३० जून २०२५ या एकाच दिवसात ३४ कोटी ४९ लाख रुपयांचा विक्रमी भरणा झाला. सीएचडीसी प्रकल्पामुळे कर आकारणीत सुलभता, पारदर्शकता आणि गतिमानता आल्याचेही महापालिकेने नमूद केले.

महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “कर संकलन विभागाने केलेले नियोजन, डेटा विश्लेषण करून विविध माध्यमातून केलेली जनजागृती मोहीम, बचत गटांमार्फत घरोघरी पोहोचवण्यात आलेली मालमत्ता करांची बिले आणि नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादातूनच ही ऐतिहासिक कामगिरी साध्य झाली आहे. करदात्यांसह सर्व विभागीय अधिकारी, कर्मचारी आणि बचत गटातील महिलांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.”

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले की, “ही विक्रमी वसुली केवळ महसूल संकलनाची आकडेवारी नाही, तर शहरवासीयांच्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे. येत्या काळातही पारदर्शक व उत्तरदायी प्रशासनाच्या माध्यमातून ही कामगिरी अधिक उंचावू. यंदाच्या आर्थिक वर्षात आतापर्यंतचे सर्वात जास्त मालमत्ता कर वसुली होईल, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.” सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालये सुरू ठेवल्याने मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.

Pimpri-Chinchwad, Municipal Corporation, Tax Collection, Property Tax, Financial Achievement, Urban Governance, Pune, Record Collection

 #PCMC #PimpriChinchwad #PropertyTax #TaxCollection #MunicipalCorporation #FinancialAchievement #PuneNews #ShekharSingh #RecordCollection

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऐतिहासिक कर वसुली; पहिल्या तिमाहीत ५२२ कोटींचा टप्पा पार पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऐतिहासिक कर वसुली; पहिल्या तिमाहीत ५२२ कोटींचा टप्पा पार Reviewed by ANN news network on ७/०१/२०२५ ०६:३३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".