'खानदेशच्या विकासासाठी काँग्रेसशी ७५ वर्षांचे नाते तोडले' - कुणाल पाटील
मुंबई: धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी मंगळवारी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) अधिकृतपणे प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्याला धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार राम भदाणे, आमदार अनुप अग्रवाल, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राहुल कुल, तसेच प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले की, कुणाल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता कुणाल पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असून, धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या प्रयत्नांना भाजप संघटनेकडून संपूर्ण साथ मिळेल, असेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले. प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी, कुणाल पाटील यांनी ज्या विश्वासाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी बोलताना कुणाल पाटील यांनी सांगितले की, गेली सुमारे ७५ वर्षे माझे कुटुंब काँग्रेस पक्षाशी जोडलेले होते. मात्र, खानदेश भागाच्या विकासासाठीच अनेक वर्षांचा काँग्रेसबरोबरचा संबंध तोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय आपण घेतला. भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यापासून खानदेशचे विकासाचे अनेक प्रलंबित प्रश्न, विशेषतः मनमाड – इंदूर मार्ग, मार्गी लागले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडून विकासाच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जात नाही, असा अनुभव असल्याचेही त्यांनी नमूद केले. आगामी काळात भारतीय जनता पार्टीची ताकद धुळे जिल्ह्यात वाढविण्यासाठी ताकदीने प्रयत्न करू, असे आश्वासनही कुणाल पाटील यांनी दिले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यशवंत खैरनार, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, धुळे तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष लहू पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विशाल सैंदाणे, बाजीराव हिरामण पाटील, योगेश पाटील, भगवान गर्दे, पंढरीनाथ पाटील, शकील अहमद, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, विलास चौधरी, ललित माळी, हरिश माळी आणि डॉ. भरत राजपूत यांसह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढल्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
Politics, Maharashtra, BJP, Congress, Political Defection, Dhule, Khandesh, Government
#MaharashtraPolitics #BJP #Congress #KunalPatil #Dhule #Khandesh #PoliticalNews #ChandrashekharBawankule #RavindraChavan #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: