पुण्यात 'मार्क्स आणि विवेकानंद' पुस्तकाचे प्रकाशन; विचारमंथनाने सभागृह गजबजले.
पुणे, दि. ४ जुलै २०२५: विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी) चा मराठी प्रकाशन विभाग आणि विवेकानंद केंद्र पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मार्क्स आणि विवेकानंद (एक तौलनिक अध्ययन)' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शुक्रवार, ४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय इतिहास संशोधक मंडळ, पुणे येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक व भाजपा प्रवक्ते माधव भांडारी होते, तर प्रमुख वक्ते म्हणून 'चाणक्य मंडल' चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी व अभिजीत जोग उपस्थित होते. उभयतांनी विचारप्रवर्तक मनोगत व्यक्त केले.
स्व. पी. परमेश्वरन लिखित आणि स्व. चं. प. भिशीकर अनुवादित या पुस्तकामध्ये मार्क्स आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा तुलनात्मक अभ्यास मांडण्यात आला आहे. कार्यक्रमात विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी) च्या मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर, विवेकानंद पुणे केंद्राचे संचालक माधव जोशी, पुस्तकाचे संपादक आनंद हर्डीकर उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वाती कुलकर्णी आणि मंजुषा कानिटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन माधव जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर जोगळेकर यांनी केले, तर आनंद हर्डीकर यांनी पुस्तक परिचय करून दिला.
मार्क्सवाद आजही जिवंत: माधव भांडारी माधव भांडारी म्हणाले की, "भारतातील मार्क्सवाद-समाजवाद संपला अशी हाकाटी मारली जाते, पण ते काही खरे नसून आजही भारतात समाजवाद, मार्क्सवाद जिवंत आहे. आज जरी समाजवादाचा राजकीय निवडणुकीत पराभव झालेला दिसत असला तरी, या विचारांचा प्रभाव अजूनही लोकांच्या मनात कायम आहे. त्याचा मतपेटीतून आविष्कार होताना दिसत नाही ही त्यांना चिंता आहे. परंतु हा विचार पुन्हा प्रभावी होऊ शकतो," असे मत भांडारी यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर अविनाश धर्माधिकारी, अभिजित जोग, सुधीर जोगळेकर, आनंद हर्डीकर, माधव जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय विचारसरणीचे महत्त्व: अविनाश धर्माधिकारी अविनाश धर्माधिकारी म्हणाले, "आजही भारतात शिक्षण, माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रात समाजवाद मार्क्सवाद जिवंत आहे. गुलामगिरीची व्यवस्था आणि संस्कृती संपविण्याच्या दृष्टीने हा मार्क्सवाद चुकीचा आहे. त्याऐवजी धर्म, मोक्ष, काम यावर आधारित असलेली, माणसाला माणूसपण बहाल करणारी भारतीय विचारसरणी, जी विवेकानंदांना अभिप्रेत होती, तीनुसारच हे विश्व चालले तरच जगाचे आणि मानवी संस्कृतीचे उत्थान होईल," असे मत धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. भारतीय संस्कृती आणि विचार हे समानतेवर अवलंबून असून, ते भांडवलशाही अर्थव्यवस्था वा दुसऱ्याच्या लुटीवर अवलंबून नाहीत, असेही मत धर्माधिकारी यांनी मांडले.
मार्क्सचा जडवाद हाच मुळी अंधश्रद्धेचा विचार होता हे आता सिद्ध झाले आहे, आणि विवेकानंदांना अभिप्रेत असलेला हिंदू धर्म हाच सर्व धर्मांची जननी आहे, हा विचार आजच्या जागतिकीकरणामुळे पुढे येत आहे, असे विचार धर्माधिकारी यांनी मांडले. मार्क्सची पूर्ण मांडणी ही केवळ आर्थिक विकास, अर्थ व्यवस्था या मुद्द्यावर होती, तर विवेकानंदांची मांडणी ही अध्यात्मिक आणि संपूर्ण विश्वातील मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी कल्याणाची होती, असेही धर्माधिकारी म्हणाले. या कार्यक्रमाला अनेक अभ्यासक आणि युवक-युवतींच्या उपस्थितीने चांगला प्रतिसाद लाभला.
Local News, Book Launch, Philosophy, Ideology, Pune, Vivekananda
#MarxAurVivekananda #BookLaunch #Pune #Philosophy #IndianCulture #VivekanandaKendra #AvinashDharmadhikari

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: