'पिंपरी-चिंचवड शहराचे नाव जिजाऊ नगर करा' - आमदार उमा खापरेंची मागणी

 


पिंपरी, पुणे, दि. १२ जुलै २०२५: पिंपरी-चिंचवड शहराचे नाव बदलून "जिजाऊ नगर" करावे आणि राजमाता जिजाऊंचा गौरव करावा, अशी मागणी आमदार उमा खापरे यांनी विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे केली आहे.   

मुंबईतील विधान भवनात सुरू असलेल्या अधिवेशनात शुक्रवारी (दि. ११ जुलै) बोलताना आमदार खापरे यांनी सांगितले की, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या गावांच्या एकत्रीकरणातून पिंपरी-चिंचवड शहराची स्थापना झाली. इंग्रजीमध्ये शहराला "PCMC" असे संबोधणे सयुक्तिक नाही, असे मत त्यांनी मांडले. जर शहराला "जिजाऊ नगर" असे नाव दिले, तर शहराचा पूर्वीचा ऐतिहासिक वारसा जपला जाईल, तसेच राजमाता जिजाऊंचा तो सन्मान ठरेल, असे त्यांनी म्हटले.

ऐतिहासिक संदर्भ आणि पूर्वीच्या मागण्या: 

राजमाता जिजाऊ यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श या शहराला झालेला आहे. राजमाता जिजाऊ यांनी दापोडीमधील महादेव मंदिरात दर्शन घेतल्याची इतिहासात नोंद आहे. तसेच चिंचवड गावातील महासाधू मोरया गोसावी महाराजांच्या समाधीस्थळी जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचेही इतिहासात नमूद आहे. सध्याचे भोसरी गाव म्हणजे राजा भोज यांची 'भोजापूर नगरी' असल्याचा उल्लेख शिलालेखात नोंद आहे, असे ऐतिहासिक संदर्भही खापरे यांनी दिले.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची नावे यापूर्वीच बदलण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवड शहराला 'जिजाऊ नगर' असे नाव द्यावे, अशी मागणी यापूर्वी भक्ती शक्ती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश हिरामण बारणे यांच्यासह शहरातील अनेक संस्था, संघटना, मंडळे, ट्रस्ट आणि नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आमदार उमा खापरे यांनी वरिष्ठ सभागृहात ही मागणी केल्यामुळे आता हा विषय लवकर मार्गी लागेल, अशी आशा पिंपरी-चिंचवड शहरवासीयांमध्ये निर्माण झाली आहे.   

'पिंपरी-चिंचवड शहराचे नाव जिजाऊ नगर करा' - आमदार उमा खापरेंची मागणी 'पिंपरी-चिंचवड शहराचे नाव जिजाऊ नगर करा' - आमदार उमा खापरेंची मागणी Reviewed by ANN news network on ७/१२/२०२५ ०६:१३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".