सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७७ ठिकाणी, तर पिंपरी चिंचवड येथे २ ठिकाणी 'गुरुपौर्णिमा महोत्सव' उत्साहात संपन्न
रामराज्य स्थापनेचा संकल्प; शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन ठरले विशेष आकर्षण
चिंचवड, ११ जुलै २०२५: सनातन संस्थेच्या वतीने देशभरातील ७७ ठिकाणी, तर पिंपरी चिंचवड येथे २ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आपल्याला हिंदुराष्ट्र हवे असेल तर 'आदर्शरित्या कसे जगायला हवे' याचे शिक्षण आपण द्यायला हवे, आपले आचार, उच्चार आणि विचार आदर्श असायला हवेत. आणि त्यासाठी आपल्या कार्याला आध्यात्मिक साधनेची जोड हवी, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे श्री. दादा वेदक यांनी केले. ते चिंचवड (पुणे) येथील 'समीर बँक्वेट अँड लॉन्स' या ठिकाणी गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते.
महत्वाचे विचार आणि उद्दिष्टे:
श्री. दादा वेदक यांनी सनातनचे साधक आदर्श जीवन जगत असल्याचे नमूद करत, सर्वांनी संघटित होऊन समाजाला धर्मशिक्षण द्यावे असे आवाहन केले. आनंद आणि शांती सत्संगातूनच प्राप्त होईल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये:
गुरुपौर्णिमा महोत्सवाची सुरुवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाली. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. 'सनातन राष्ट्र शंखनाद' या विषयावर प्रेरणादायी व्हिडिओ दाखवण्यात आला. रामराज्य स्थापनेसाठी संकल्प आणि सामूहिक नामजपयज्ञ करण्यात आला.
धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र अशा विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि फलक प्रदर्शन लावण्यात आले होते. पुणे येथील 'समीर बँक्वेट अँड लॉन्स' येथे श्री. विक्रम भावे यांनी त्यांच्या 'दाभोलकर हत्या आणि मी' या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच, या वेळी शिवकालीन शस्त्रास्त्रांचे दुर्मिळ प्रदर्शन हे विशेष आकर्षण ठरले.
तळेगाव येथील महोत्सवातील विचार:
तळेगाव येथील अपूर्वा गार्डन मंगल कार्यालय येथे झालेल्या महोत्सवात माजी जिल्हा न्यायाधीश आणि माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख यांनी उपस्थितांना संबोधित केले. ईश्वराचा सेवक या भावाने आपल्या भागातील मंदिरांचे व्यवस्थापन होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तरच आपली मंदिरे आपल्या धर्मासाठी प्रेरणास्थाने होतील असे मत त्यांनी व्यक्त केले. श्री. केतन पाटील यांनीही राष्ट्र धर्म याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: