पुणे - काही वर्षांपासून मी अनेक संस्था, संघटनांशी जोडला गेलेलो आहे, त्या माध्यमातून माझे कार्य चालू आहे. पण खरे हिंदुत्व म्हणजे काय असते हे मला सनातन संस्थेमुळे समजले. 'सनातन संस्थेच' कार्य अद्भुत आहे. साधकांची श्रद्धा मी शब्दात वर्णन करू शकत नाही. आपण वेगवेगळे डे साजरे करतो परंतू आजचा दिवस अतिशय महत्वाचा असून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण 'सेवेचा' संकल्प घेऊया असे आवाहन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री.शेखर मुंदडा यांनी कोथरूड येथील १० जुलै २०२५ रोजी संपन्न झालेल्या गुरूपौर्णिमा महोत्सवात केले. तसेच या ठिकाणी 'आदर्श शिष्य कैसे बने ?' या ई बुकचे प्रकाशन करण्यात आले. यंदा गुरुपौर्णिमा महोत्सव देशभरातील ७७ ठिकाणी आणि पुणे शहरात ४ ठिकाणी साजरा करण्यात आला.
प्रारंभ श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले गेले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ या विषयावर प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण करण्यात आले. रामराज्य स्थापनेसाठी संकल्प व सामूहिक नामजपयज्ञ करण्यात आला. धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.
सातारा रस्ता येथील विणकर सभागृह येथे लेखक, कीर्तनकार, वास्तुविशारद श्री. विवेक सिन्नरकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, जो भारत भूमीचे रक्षण करतो तो हिंदू ! आपल्याला आता हिंदूंमध्ये चेतना निर्माण करायला पाहिजे. शारीरिक व मानसिक स्तरावर सिद्ध व्हायला पाहिजे. सिंहगड रस्ता, पुणे येथील 'सिद्धार्थ हॉल'मध्ये भाजप महिला मोर्चा पुणेच्या सरचिटणीस सौ. उज्ज्वला गौड यांनी मार्गदर्शन केले. गुरुदेवांच्या कार्यात खारीच्या वाट्याने नाही सिंहाच्या वाट्याने उभे राहावे असे त्यांनी सांगितले.
तर भोर येथील रामबाग हॉल येथे शिंद, तालुका भोर येथील गुरुकुलधामचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. उमेश महाराज शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. मंदिरांचे सरकारीकरण रोखण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तसेच श्री. सम्राट देशपांडे, कु. क्रांती पेटकर आणि श्री. नागेश जोशी यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: