पुणे : वानवडी पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. २७ वर्षीय आकाश महादेव कांबळे याला चार वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली आहे.
शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने गेल्या १४ जुलै २०२५ रोजी हा निकाल दिला. आरोपीला भारतीय दंड विधान कलम ३५४, ३५४(अ), ३५४(ब) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ७, ८, ११, १२ अंतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.
घटनेची पार्श्वभूमी
वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. क्रमांक ५९६/२०१७ अन्वये नोंदवण्यात आलेल्या या प्रकरणात आरोपी आकाश महादेव कांबळे (वय २७ वर्षे, रा. सी.ओ. किसन राउत यांचेघरी, गटनं. २/बी, सय्यदनगर, कल्पतरू सोसायटी, हडपसर, पुणे) मूळ राहणार यळवट, किल्लारी, तालुका औसा, जिल्हा लातूर याने २९ डिसेंबर २०१७ रोजी एक लहान मुलगी तिच्या राहत्या घरी गॅलरीत खेळत असताना आरोपी तिच्या घरात घुसून तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने खोलीत घेऊन गेला. त्यानंतर तिच्या अंगावर हात फिरवून तिचे कपडे काढत असताना फिर्यादीस मिळून आला.
तपासाची प्रक्रिया
या गुन्ह्याचा तपास पोलीस उप-निरीक्षक वर्षाराणी घाटे यांनी केला आणि आरोपी विरुद्ध विहित मुदतीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याचा स्पेशल सेशन केस क्रमांक १६८/२०१८ असा होता.
प्रकरणात आरोपीस सबळ पुरावे सादर केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीला चार वर्षे कठोर कारावास आणि १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास पाच महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल अशी अट घातली आहे.
पोलीस यंत्रणेची भूमिका
सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील मिलींद दातरंगे आणि कोर्ट पैरवी दिनेश जाधव यांनी कामकाज पाहिले. या कार्यवाहीला प्रोत्साहन देत पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे यांनी कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार दिनेश जाधव आणि मुख्य गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक वर्षाराणी घाटे यांना १०,००० रुपये बक्षिस मंजूर केले आहे.
Crime, Conviction, POCSO Act, Sexual Assault
#PuneCrime #POCSO #Conviction #SexualAssault #WanwadiPolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: