'मेनोपॉज'बाबत समाजात संवाद वाढवणे गरजेचे: विजया रहाटकर

 


पुणे, ३ जुलै २०२५: "स्त्रीचं आरोग्य हे केवळ वैद्यकीय नव्हे, तर सामाजिक व भावनिक विषय आहे. मेनोपॉजचा काळ हा महिलांसाठी केवळ जैविक बदल नाही, तर मनोवैज्ञानिक व सामाजिक संक्रमण आहे," असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय महिला आयोग आणि रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होणाऱ्या 'मेनोमाइंड' उपक्रमाच्या औपचारिक उद्घाटनावेळी त्या पुण्यात बोलत होत्या. बुधवारी सायंकाळी रहाटकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक व संचालक डॉ. गिरीश लाड आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

'मेनोमाइंड': महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

विजयाताई रहाटकर यांनी सांगितले की, "केवळ कायदे करून महिलांचा विकास शक्य नाही, महिलांना उत्तम आरोग्य मिळालं तरच त्यांचा खरा विकास होतो." 'मेनोमाइंड' हा त्याच दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यासाठी जनजागृती करणे, महिलांमध्ये व समाजात मेनोपॉजबाबत संवाद वाढवणे, तसेच या उपक्रमाची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यातील महिलांपर्यंत पोहोचवणे आणि शासनाच्या आरोग्य धोरणांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी विषय मांडणे गरजेचे आहे.

रहाटकर पुढे म्हणाल्या की, उपक्रमाचा उद्देश सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचण्याचा आहे, विशेषतः अशा महिलांपर्यंत ज्या मध्यमवर्गीय व ग्रामीण भागात राहतात आणि आरोग्य शिक्षणापासून दूर असतात.

मेनोपॉजबाबत जनजागृतीची गरज

मेनोपॉज हा वैयक्तिक अनुभव असला तरीही आज या विषयावर बोलायला महिला तयार नसतात. पूर्वी मासिक पाळीबद्दलही असंच होतं, परंतु जनजागृती झाल्यामुळे आज मोकळेपणाने या विषयावर बोललं जाऊ लागलं आहे. अशाच प्रकारे मेनोपॉजबाबतसुद्धा जनजागृती होणे गरजेचे आहे.

महिलांचा मेनोपॉजचा कालावधी अलीकडे सरकत चालला आहे, ही खूप गंभीर बाब आहे. महिला मोठ्या संघर्षातून, वेगवेगळ्या अवस्थांमधून काहीतरी मिळवतात आणि ऐन उमेदीच्या काळात मेनोपॉजमुळे त्यांच्या मनात ध्येय सोडण्याचा विचार येऊ लागतो, कुठेतरी थांबावं असं वाटू लागतं. यासाठी त्यांना या टप्प्यातून बाहेर काढणे खूप गरजेचे असते, असे रहाटकर यांनी अधोरेखित केले.

"जेव्हा पुरुष महिलांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने लिंग समानता साध्य होते," असेही रहाटकर यांनी स्पष्ट केले.

'मेनोपॉज'चे घटते वय आणि सामाजिक पैलू

यावेळी बोलताना डॉ. गिरीश लाड म्हणाले, "या उपक्रमामागे एक गंभीर बाब आहे — मेनोपॉज होण्याचं वय झपाट्याने कमी होत आहे आणि यासोबत मानसिक व सामाजिक समजूतदारपणाचाही अभाव आहे. पूर्वी जे वय ४५-५० दरम्यान मानले जायचे, ते आता ३५ व्या वर्षीच सुरू होण्याची लक्षणे दिसत आहेत."

लाड यांनी पुढे सांगितले की, "मेनोपॉज ही एक नैसर्गिक प्रक्रिया असूनही, अजूनही समाजात ती लाजेची किंवा दुर्लक्षित गोष्ट मानली जाते. महिलांना एकटेपणा, नैराश्य आणि 'आपलं स्त्रीत्व संपलं का?' असे विचार सतावत असतात. दुर्दैवाने, कुटुंबीयांनाही याची पुरेशी जाणीव नसते."

व्यापक बहुभाषिक अभियान

या पार्श्वभूमीवर, रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमांतून एक व्यापक बहुभाषिक अभियान सुरू करणार आहे. या उपक्रमाचा उद्देश २५ ते ३० कोटी मेनोपॉज किंवा पेरी-मेनोपॉज अवस्थेतील भारतीय महिलांपर्यंत पोहोचणे आहे. या कार्यक्रमाची रचना पारंपरिक आरोग्य सत्रांप्रमाणे न करता, वेबसीरिजसारखी प्रभावी व भावनिक अनुभव देणारी असेल – प्रेक्षकांना आकर्षक वाटणारी, समजण्यास सोपी आणि संवादात्मक.

यामध्ये ५० तासांचा "Train the Trainer" कार्यक्रमही असेल, ज्याद्वारे प्रशिक्षित लोक आपल्या समाजात जागरूकता निर्माण करू शकतील. रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशनतर्फे सर्व समाजघटकांना या उपक्रमात सहभागी होऊन महिलांना मानसिक, भावनिक आणि सामाजिक आधार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


 Menopause Awareness, Women's Health, National Commission for Women, Vijaya Rahatkar, Dr. Girish Lad, Menomind, Public Health Campaign, Women Empowerment, Pune

 #MenopauseAwareness #WomensHealth #Menomind #VijayaRahatkar #NationalCommissionForWomen #Pune #PublicHealth #WomensEmpowerment #HealthDialogue

'मेनोपॉज'बाबत समाजात संवाद वाढवणे गरजेचे: विजया रहाटकर 'मेनोपॉज'बाबत समाजात संवाद वाढवणे गरजेचे: विजया रहाटकर Reviewed by ANN news network on ७/०३/२०२५ ०६:४७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".