३ गुन्हे उघड, ५.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या आरोपीच्या डोंबिवली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमुळे परिसरात वाढलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांना आळा बसला आहे.
या परिसरात चेन स्नॅचिंगचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले होते, त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने अँटी-चेन स्नॅचिंग पेट्रोलिंग आणि नाकाबंदीचे आयोजन करून गुन्हेगारांना पकडण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आरोपी प्रत्येक वेळी मोटारसायकल बदलत असल्याने, त्याला शोधणे पोलिसांसाठी एक आव्हान बनले होते.
दिनांक २३ जून २०२५ रोजी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास ९० फूट रोड, दावत हॉटेलसमोर मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरीने लुटल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना, डोंबिवली पोलीस ठाणे तपास पथकाने कौशल्य आणि तांत्रिक माहितीचा वापर करून सराईत आरोपी निखील सुभाष लोंढे (वय २२, रा. हनुमान नगर, महात्मा फुले नगर, डोंबिवली पूर्व) याला अटक केली.
पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत, आरोपी निखील लोंढे याने डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी दोन गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यामध्ये डोंबिवली पोलीस ठाणे गु.रजि.नं. ५५१/२०२५ (कलम ३०९ (६), ३(५) भारतीय न्याय संहिता), डोंबिवली पोलीस ठाणे गु.रजि.नं. ५०४/२०२५ (कलम ३०४ (२), ३(५) भारतीय न्याय संहिता) आणि मध्यवर्ती पोलीस ठाणे गु.रजि.नं. ५४८/२०२५ (कलम ३०४ (२), ३(५) भारतीय न्याय संहिता) या तीन गुन्ह्यांचा समावेश आहे.
आरोपीकडून डोंबिवली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमधील १,८०,००० रुपये किमतीची २० ग्रॅम सोन्याची चेन आणि ९०,००० रुपये किमतीची १० ग्रॅम सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली आहे. तसेच, वरील तिन्ही गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या १,१५,००० रुपये किमतीची पल्सर मोटार सायकल (क्र. MH-०५/FS-९६५६) आणि १,७०,००० रुपये किमतीची यामाहा कंपनीची स्कूटर (क्र. MH-०५/FY-१४७०) असा एकूण ५,५५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास डोंबिवली पोलीस ठाणे तपास पथक करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, ठाणे शहर, सह पोलीस आयुक्त, ठाणे शहर, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), ठाणे शहर, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ३), ठाणे शहर, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (डोंबिवली विभाग), ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली.
Crime, Thane News, Chain Snatching, Arrest, Police Action, Dombivli
#DombivliPolice #ChainSnatching #CrimeNews #ThanePolice #Arrest #MorningWalkSafety #MaharashtraPolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: