बळजबरीने धर्मांतराच्या प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांची समिती कार्यरत
मुंबई, दि. १४ जुलै २०२५: राज्यात बळजबरीने धर्मांतर करण्याच्या प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांची समिती आधीच कार्यरत असून, या समितीच्या अहवालानुसार राज्य सरकार लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणेल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधानपरिषदेत दिली.
आमदार उमा खापरे यांनी दौंड जिल्ह्यातील केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेत शिकणाऱ्या मुलींवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची सक्ती होणे आणि त्यांच्याशी चुकीची वर्तणूक या प्रकरणी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला मंत्री भोयर उत्तर देत होते.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक पदावरच्या महिला अधिकाऱ्याची समिती नेमण्यात आली असून, तिचा अहवाल एका महिन्याच्या आत सादर होईल. त्यानंतर अहवालानुसार संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्याच्या दिशेने योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
आमदार प्रवीण दरेकर आणि मनीषा कायंदे यांनी राज्यात धर्मांतराचा मुद्दा अधोरेखित करून याबाबत कठोर कायदा आणण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. देशातल्या अकरा राज्यांमध्ये धर्मांतरविरोधी कायदा असून, असा कायदा सरकार पुढच्या अधिवेशनात आणणार का, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर, मंत्री भोयर यांनी, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील अकरावें राज्य असेल, अशी ग्वाही दिली.
#MaharashtraPolitics #AntiConversionLaw #PankajBhoyar #LegislativeCouncil #ForcedConversion #MaharashtraGovernment #UmaKhapre #PuneNews #ReligiousFreedom #IndianLaw

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: