ए एन एन न्यूज नेटवर्क बातमीपत्र
दिनांक ०४ जून २०२५
ठळक बातम्या
पुणे: इंजिनीअरिंग परीक्षेत गैरप्रकार; प्राध्यापकासह चौघांना अटक
कोथरूडमध्ये 'गांधी दर्शन' शिबिराचे आयोजन
शिवसेनेचा पर्यावरणपूरक उपक्रम: कापडी पिशव्यांचे मोफत वाटप
स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजपची आदरांजली
आता पाहूया सविस्तर बातम्या
पुणे
शहरातील वाघोली येथील पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये
इंजिनीअरिंगच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुन्हे
शाखा युनिट ६ ने प्राध्यापकासह चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापक प्रतिक किसन सातव आणि त्याचे साथीदार आदित्य
यशवंत खिलारे, अमोल अशोक नागरगोजे आणि अनिकेत शिवाजी रोडे यांना अटक करण्यात आली
आहे. हे सर्व आरोपी वाघोली परिसरातील रहिवासी आहेत. आरोपींनी
संगनमत करून विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० हजार ते ५० हजार रुपये घेतले आणि
परीक्षेत पास करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी त्यांनी कॉलेजमधील परीक्षा
नियंत्रण कक्षाची बनावट चावी बनवून उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार केला. आरोपींनी
गणित २ विषयाच्या उत्तरपत्रिकांचे सहा बंडल काढून विद्यार्थ्यांच्या मूळ
उत्तरपत्रिकांमध्ये बदल केला
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त
विद्यमाने कोथरूडमध्ये 'गांधी दर्शन' शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर
रविवार, ८ जून २०२५ रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत कोथरूडमधील गांधी
भवनच्या सभागृहात होणार आहे.
शिबिरामध्ये विविध विषयांवर नामवंत वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
ज्येष्ठ विधितज्ञ उल्हास बापट 'न्यायपालिका व कार्यपालिका यांच्यामधील संघर्ष आणि
सर्वोच्च न्यायालयाची भूमिका' या विषयावर, मुक्त पत्रकार प्रशांत कदम 'माध्यमांचा
उन्माद आणि नवराष्ट्रवाद' या विषयावर, तर दिग्दर्शक मंजुल भारद्वाज 'आस्था,
श्रद्धा आणि संविधान' या विषयावर आपले विचार व्यक्त करतील. महाराष्ट्र गांधी
स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी शिबिराच्या अध्यक्षस्थानी असतील.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवसेनेने खारघर येथे प्लास्टिक
बंदीला पाठिंबा दर्शवत एक समाजोपयोगी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत,
शिवसेना दुकानदार आणि नागरिकांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करणार आहे. या
कापडी पिशव्यांचे अनावरण नुकतेच खारघर येथील लिटल मॉल येथे एका समारंभात झाले.
लोकनेते, माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ
मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)
च्या वतीने पिंपरी येथील मोरवाडी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
बातमीपत्र संपले
धन्यवाद
Reviewed by ANN news network
on
६/०४/२०२५ ०८:१४:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: