पुण्यात 'डिव्हाईन कॉन्फ्लुएन्स २०२५' मध्ये भारतीय आणि आशियाई कलांचा भव्य संगम; प्रेक्षकांची मने जिंकली
पुणे, २२ जून २०२५: भारतीय शास्त्रीय आणि आशियाई पारंपरिक कलांचा मोहक संगम असणाऱ्या ‘डिव्हाईन कॉन्फ्लुएन्स २०२५’ या मनीषा नृत्यालयाच्या कार्यक्रमाला रविवार, दिनांक २२ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. ज्येष्ठ नृत्यगुरु पं. मनीषा साठे यांच्या मनीषा नृत्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कथक नृत्याच्या प्रशिक्षण व प्रसार क्षेत्रात या संस्थेने दिलेल्या पाच दशकांहून अधिक योगदानाचा गौरव या निमित्ताने करण्यात आला.
आशियाई कलांचे वैविध्यपूर्ण सादरीकरण:
या वेळी कोरियन फॅन डान्स, ड्रॅगन डान्स, हेवन लेडी आणि चायनीज स्टिक डान्स यांसारख्या आशियाई पारंपरिक नृत्यप्रकारांनी रसिक भारावले. आशियातील विविध संस्कृतींच्या रंगांची उधळण करत या कार्यक्रमाने सीमोलंघन केले. खास या सोहळ्यासाठी जपानहून भारतात दाखल झालेल्या ताकिमोतो यांची कन्या हागोरोमो ताकिमोतो हिने 'ओ दायको' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जपानी ड्रमचे एकल वादन अतिशय लीलया केले. तिच्या वादनातील जोश, वेग आणि सहजता पाहून प्रेक्षक स्तिमित झाले.
'नृत्यधारा' - पिढ्यांतील अनोखा संगम:
कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरले ‘नृत्यधारा’ हे भावस्पर्शी कथक सादरीकरण. यामध्ये गुरु मनीषा साठे, त्यांची कन्या शांभवी दांडेकर, सून तेजस्विनी साठे आणि नात सर्वेश्वरी साठे व आलापी जोग - अशा तीन पिढ्यांतील पाच नृत्यांगनांनी एकत्र सादरीकरण करत पारंपरिकतेचा आणि कौटुंबिक वारशाचा अनोखा संगम प्रेक्षकांसमोर मांडला.
मान्यवरांची उपस्थिती आणि मनीषा साठे यांचे मनोगत:
या कार्यक्रमासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे-चापेकर, शमा भाटे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते. मंचावर त्यांचा सन्मान केला गेला.
नृत्य गुरु पं. मनीषा साठे यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, "सर्जनशीलता, परंपरा आणि नवतेचा मेळ साधणारी प्रतिभा पुढे आली पाहिजे. दोन वेगळ्या देशातील कलांचा संगम साधताना त्यामागे कमालीची मेहनत आणि कलाकाराने घेतलेला उत्तमाचा ध्यास असतो." यापुढील काळात हे मोठमोठे जपानी ड्रम्स सुरक्षितपणे ठेवता यावेत म्हणून जागा उपलब्ध करून देण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे असे आवाहन मनीषा साठे यांनी या प्रसंगी केले. हजारो उपस्थितांपैकी दिलदार व्यक्ती नक्की अशी जागा देऊ करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन स्वानंद पटवर्धन यांनी केले. कार्यक्रमासाठी पुण्यातून आणि पुण्याबाहेरून अनेक नर्तक आवर्जून उपस्थित राहिले होते.
'डिव्हाईन कॉन्फ्लुएन्स २०२५' : एक अभूतपूर्व कलाविष्कार !
१९९१ सालापासून गुरु मनीषा साठे या जपानी संगीतज्ञ यासुहितो ताकिमोतो यांच्यासह जपानी आणि भारतीय संगीतक्षेत्रात उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत, ज्याचा रसास्वाद जपानी, भारतीय आणि जगभरातील प्रेक्षकांनी वेळोवेळी अनेक दिमाखदार सोहळ्यांमधून घेतलेला आहे.
‘डिव्हाईन कॉन्फ्लुएन्स २०२५’ कार्यक्रमाची सुरुवात पं. मनीषा साठे, त्यांची कन्या शांभवी दांडेकर, स्नुषा तेजस्विनी साठे, नात सर्वेश्वरी साठे आणि आलापी जोग यांच्या त्रिदेववंदनेने झाली आणि वातावरण मंगलमय झाले. हागोरोमो ताकिमोतो हिने 'ओ दायको' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जपानी ड्रमचे एकल वादन अतिशय लीलया केले. तिच्या वादनातील जोश, वेग आणि सहजता पाहून प्रेक्षक स्तिमित झाले. त्यानंतर आडा चौताल हा अनवट ताल गुरु मनीषा साठे आणि कलावतींनी तायको वादनाच्या साथीवर प्रस्तुत केला. विशेष म्हणजे जपानी तायको ड्रमचे वादनही मनीषाताईंच्या शिष्या अदिती कुलकर्णी आणि प्राजक्ता द्रविड या करत होत्या. तालाचे बारकावे, रचनांचे सौंदर्य हे नृत्यातून आणि वादनातून तितक्याच प्रभावीपणे प्रकट होत होते त्यामुळे ही अप्रतिम प्रस्तुती संपूच नये अशीच प्रेक्षकांची भावना होती!
जपानी किमोनो परिधान केलेल्या युवती जेव्हा कोरियन फॅन्स घेऊन मंचावर अवतरल्या तेव्हा त्यांच्या नृत्य लालित्याने रसिकांना जिंकून घेतले. त्यानंतर विविध प्रकारचे जपानी ड्रम्स एकाच वेळी मंचावर स्थानापन्न करण्यात आले आणि त्या प्रत्येकाची खासियत मनावर कोरली जाईल असे बहारदार वादन मनीषाताईंच्या शिष्यांनी केले. मिथिला भिडे हिने मनीषा ताईंच्या मार्गदर्शनाखाली ह्या संरचनेचे दिग्दर्शन केले होते. क्युबिकल तायकोसेटमध्ये एकावेळी १२ तायकोंचे वादन करणे, त्यातील अवधान आणि डौल सांभाळणे, हे आव्हान वादकांनी उत्तम पेलले. उभ्या आणि आडव्या दिशेतील ड्रम्सचे वादन केवळ श्रवणीय नाही तर अत्यंत प्रेक्षणीयही होते.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धाची सुरुवात ‘संयुज’ या रचनेने झाली. त्याचे वैशिष्ट्य असे की फ्रेंच संगीतकार रावेल याच्या ‘बोलेरो’ या रचनेला भारतीय संगीत साज चढवून कथक नृत्यांगनांनी तो सादर केला. रचना अर्थातच गुरु मनीषा साठे यांची होती. कलासंगमाची ही छटा फारच सुंदर भासली. त्यानंतरच्या रचनेत सतारीच्या संगीताला जपानी संगीताची जोड देऊन त्यावर केलेले तायको ड्रमचे वादन तर केवळ लाजवाब झाले. ही रचना, कथक नर्तिका थेट जपानला जाऊन ताकिमोतो यांच्याकडून प्रत्यक्ष शिकून आल्या होत्या. जपान देशात देवतेचे स्थान असलेला ड्रॅगन आणि मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या हेवन लेडीचे नृत्य नेत्रदीपक होते. रंगीबेरंगी लांबसडक स्कार्फच्या, नृत्यातून उमटणाऱ्या चित्राकृती जितक्या मोहक तितक्याच कौशल्यपूर्ण होत्या. तेजस्विनी साठे यांनी आपल्या 'टॅन्झ अकॅडमी'च्या शिष्यांसमवेत सादर केलेला ‘त्रिवट’ म्हणजे दर्जेदार संगीत, रेखीव नृत्यसंरचना म्हणजे रंगमंचीय अवकाशाला जिवंत करणारी ऊर्जा यांचे प्रतीक!
कार्यक्रमाची सांगता 'मेलांज' या आगळ्या रचनेने झाली. कथकची देहबोली प्रतिबिंबित करणारे डौलदार तायको वादन आणि ड्रम्सच्या गगनभेदी ध्वनीला पूरक असे जोशपूर्ण नर्तन यामुळे ही मैफल रंगली. त्यातही प्रस्तुतीचा कळस गाठला तो स्वतः गुरु मनीषा साठे यांनी केलेल्या तायको वादनाने! रसिकांनी भरभरून दिलेली दाद ही त्यांना दिलेली मानवंदनाच होती.
Divine Confluence 2025, Manisha Nrityalaya, Manisha Sathe, Kathak, Japanese Drums, Taiko, Hagoromo Takimoto, Shambhavi Dandekar, Tejaswini Sathe, Sarveshwari Sathe, Aalapi Jog, Ganesh Kala Krida Manch, Chandrakant Patil, Sucheta Bhide-Chapekar, Shama Bhate, Rajesh Pande, Puneet Joshi, Swananad Patwardhan, Mithila Bhide, Ravel's Bolero.
#DivineConfluence2025 #ManishaNrityalaya #Kathak #JapaneseCulture #IndianClassicalDance #PuneEvents #CulturalFusion #ManishaSathe #GoldenJubilee
Reviewed by ANN news network
on
६/२३/२०२५ ०२:१५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: