पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ५ पिस्तुले आणि २० काडतुसे जप्त
पिंपरी-चिंचवड, दि. २: पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तळेगाव दाभाडे परिसरातून तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल २ लाख ७० हजार रुपये किमतीची ५ गावठी बनावटीची पिस्तुले आणि २० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई १ जून २०२५ रोजी मध्यरात्री पावणेएक वाजण्याच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या निलया सोसायटीजवळ करण्यात आली.
उमेश चंद्रकांत केदारी (वय २८, रा. पुनावळे, ता. मुळशी), मंथन उर्फ गोट्या अशोक सातारकर (वय २८, रा. कान्हे, ता. मावळ) आणि विशाल ज्योतीराम खानेकर (वय ३०, रा. मोहितेवाडी, ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे पोलीस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत (ब.नं. २६४३) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २८ मे ते १० जून २०२५ या कालावधीत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू आहेत. असे असतानाही, अटक केलेले आरोपी १ जून रोजी मध्यरात्री निलया सोसायटीजवळ संशयास्पदरित्या थांबले होते.
गुन्हे शाखेच्या पथकाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे २ लाख ५० हजार रुपये किमतीची ५ लोखंडी गावठी पिस्तुले आणि २० हजार रुपये किमतीची २० जिवंत काडतुसे (राऊंड) आढळून आली. ही शस्त्रे बाळगण्याचा त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नव्हता. दहशत माजवण्यासाठी किंवा विक्रीसाठी त्यांनी ही शस्त्रे बाळगली असल्याचा संशय पोलिसांना आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, ५, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस त्यांच्याकडे अधिक चौकशी करत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ढमाळ करत आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------
#PimpriCrime #ArmsSeizure #IllegalWeapons #TalegaonDabhade #Arrested #CrimeBranch #PunePolice
Reviewed by ANN news network
on
६/०२/२०२५ ०४:४९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: