वारकऱ्यांसाठी सेवासुविधांमध्ये कमतरता नको: आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देश

 

आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

पिंपरी, दि. २: आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वारकऱ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये, असे स्पष्ट निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत. वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी सर्व यंत्रणांनी समन्वयाने सोयीसुविधांचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी पिंपरी चिंचवड शहरात आगमन होणार असून, या दिवशी पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे असणार आहे. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २० जून रोजी पिंपरी चिंचवड हद्दीत आगमन होऊन त्याच दिवशी ती पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. या दोन्ही सोहळ्यांच्या स्वागतासाठी महापालिकेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी आयुक्त सिंह यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीच्या आकुर्डी येथील मुक्कामाच्या ठिकाणाची आणि प्रस्तावित वारकरी भवनाच्या जागेची पाहणी करून आढावा घेतला.

या पाहणी दौऱ्यात शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, उपायुक्त अण्णा बोदडे, नगर रचनाकार प्रशांत शिंपी, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कार्यकारी अभियंता वैशाली ननावरे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, हभप माणिकबुवा मोरे, हभप जगन्नाथ पाटील, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी माजी नगरसेवक प्रमोद कुटे, गुलाब कुटे, दयानंद शेवाळे, रविंद्र जाधव, अशोक वाळुंज, सौरभ शिंदे, दत्ता चिंचवडे, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव आप्पा बागल आदी उपस्थित होते.

पालखी विसाव्याच्या ठिकाणाची पाहणी करताना आयुक्त सिंह यांनी तेथील सोयीसुविधांची सविस्तर माहिती घेतली. वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी योग्य त्या सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मुक्कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवरील तसेच पालखी मार्गावरील कचरा आणि राडारोडा त्वरित उचलण्यात यावा. पालखी विसाव्याच्या आणि मार्गाच्या ठिकाणी नियमित साफसफाई करावी. पावसाचे पाणी कुठेही साचणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आयुक्त सिंह यांनी यावेळी दिले.

--------------------------------------------------------------------------------------------------------- #PimpriChinchwad #AshadhiWari #Palakhi #Pilgrimage #ShetkarSingh #PMC #Warkari #Maharashtra

वारकऱ्यांसाठी सेवासुविधांमध्ये कमतरता नको: आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देश वारकऱ्यांसाठी सेवासुविधांमध्ये कमतरता नको: आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देश Reviewed by ANN news network on ६/०२/२०२५ ०६:२४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".