स्वच्छता निरीक्षक ५ लाखांची लाच मागताना रंगेहाथ जेरबंद

 


हेल्थ लायसन्ससाठी ५ लाखांची लाच मागितली; २ लाखांचा हप्ता स्वीकारताना अटक

मुंबई : मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील एका स्वच्छता निरीक्षकाला ५ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आणि त्यातील २ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. सांताक्रुझ येथील एच/पूर्व विभागातील स्वच्छता निरीक्षक सरबजीतसिंह करतारसिंह बाजवा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी तक्रारदारांची एक खाजगी कंपनी असून, ती विविध व्यावसायिक आस्थापनांना हेल्थ लायसन्स, इमारत परवानग्या आणि इतर सरकारी कार्यालयांमधील आवश्यक परवानग्या काढून देण्यासाठी सल्लागार (कन्सल्टंट) म्हणून काम करते. तक्रारदारांच्या सांताक्रुझ येथील एका क्लायंटला त्यांच्या आस्थापनेसाठी हेल्थ लायसन्सची आवश्यकता होती.

त्यानुसार, तक्रारदारांनी एच/पूर्व विभाग, मनपा, मुंबई येथे जाऊन लोकसेवक सरबजीतसिंह करतारसिंह बाजवा यांची भेट घेतली. बाजवा यांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी २ लाख रुपये द्यावे लागतील, असे तक्रारदारांना सांगितले. तक्रारदारांनी ही रक्कम दिल्यानंतर त्यांना ऑनलाइन हेल्थ लायसन्स प्राप्त झाले होते.

त्यानंतर, लोकसेवक बाजवा आणि वैद्यकीय अधिकारी प्रमोद पाटील यांनी तक्रारदारांच्या क्लायंटच्या आस्थापनेची पाहणी केली. त्यावेळी बाजवा यांनी ऑनलाइन प्राप्त झालेल्या हेल्थ लायसन्समध्ये काही त्रुटी असल्याचे सांगत, ते रद्द करण्याची धमकी दिली आणि हे लायसन्स रद्द न करण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या क्लायंटच्या व्यवसायात अडथळा निर्माण न करण्यासाठी पुन्हा ५,००,०००/- (पाच लाख रुपये) लाचेची मागणी केली.

तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधल्यानंतर, एसीबीने या लाचेच्या मागणीची पडताळणी केली. पडताळणीअंती, दि. ०६/०६/२०२५ रोजी लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. लाचेचा पहिला हप्ता म्हणून २,००,०००/- (दोन लाख रुपये) स्वीकारताना सरबजीतसिंह करतारसिंह बाजवा यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीमती पद्मावती कलाल करत असून, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत माळी यांच्या पर्यवेक्षणाखाली ही कारवाई करण्यात आली. अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण, अपर पोलीस उप आयुक्त अनिल तुकाराम घेरडीकर आणि राजेंद्र गणपत सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, भ्रष्टाचारसंबंधी काही माहिती असल्यास किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभागाशी संपर्क साधावा.


Mumbai, Anti-Corruption Bureau, ACB, Bribery, Arrest, BMC, Health License, Public Health Department, Sanitation Inspector, Corruption, Law Enforcement.

 #Mumbai #ACB #AntiCorruption #Bribe #BMC #HealthLicense #CorruptionFree #MumbaiPolice #LawAndOrder #BriberyArrest

स्वच्छता निरीक्षक ५ लाखांची लाच मागताना रंगेहाथ जेरबंद  स्वच्छता निरीक्षक ५ लाखांची लाच मागताना रंगेहाथ जेरबंद Reviewed by ANN news network on ६/१०/२०२५ ०२:२३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".