पुणे: पुणे शहरात १० जून ते २३ जून २०२५ या कालावधीसाठी १४ दिवसांचे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांकडून होणारी आंदोलने आणि अतिक्रमण हटवण्याच्या कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, पोलिसांनी सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
या आदेशांतर्गत, कोणताही दाहक, स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ सोबत नेण्यास मनाई आहे. दगड, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका किंवा शारीरिक इजा पोहोचवू शकणाऱ्या कोणत्याही वस्तू जवळ बाळगण्यास, जमा करण्यास किंवा तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, कोणत्याही व्यक्तीचे चित्र, प्रतिकात्मक प्रेत, पुढाऱ्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन किंवा दहन करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सार्वजनिक टीका करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, गाणी गाणे, वाद्य वाजवणे यासारख्या कृत्यांवरही प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
याव्यतिरिक्त, पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींनी आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय एकत्र जमा होणे, सभा घेणे किंवा मिरवणुका काढण्यास सक्त मनाई आहे. सार्वजनिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या, किंवा राज्य उलथवून टाकण्यास प्रवृत्त करणाऱ्या प्रतिमा, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तू तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करणे यावरही बंदी आहे.
हे आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना (ज्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे) तसेच ३.५ फुटांपर्यंत लांबीच्या लाठ्या बाळगणाऱ्या खासगी सुरक्षा रक्षक, गुरखा किंवा चौकीदार यांना लागू नाहीत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र ठरवण्यात येईल. आदेशाची मुदत संपल्यानंतरही गुन्हेगाराची 'रील' बनवून सोशल मीडियावर दहशत पसरवल्यास किंवा धमकी दिल्यास कायदेशीर कारवाई सुरूच राहील.
विशेष शाखा, पुणे शहर उप आयुक्त मिलिंद मोहिते यांनी ६ जून २०२५ रोजी हे आदेश दिले आहेत. हे आदेश सर्व पोलीस ठाणी, सहाय्यक आयुक्त कार्यालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
- ---------------------------------------------------------------------------------------------------------------- Prohibitory Order, Law and Order, Public Safety, Pune, Maharashtra Police, Security
- #PunePolice, #ProhibitoryOrder, #LawAndOrder, #PublicSafety, #Maharashtra, #PuneSecurity

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: