पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनी महोत्सवाचा समारोप
पिंपरी, २७ जून २०२५: तरल स्वरांच्या लयदार ताना, मनाला रुंजी टाकणारे शास्त्रीय राग आणि रसिकांची भरभरून दाद... अशा सुरमयी वातावरणात प्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांनी श्रोत्यांना स्वरमग्नतेच्या सागरात अक्षरशः आकंठ बुडवले. आसमंताला साद घालणाऱ्या शब्दसुरांच्या संगीतमय जादुई वर्षावाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
पिंपरी चिंचवड महापालिकेने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनाचे औचित्य साधून आकुर्डी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मकरंद निकम, सहआयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे, सेवानिवृत्त सहशहर अभियंता संदेश चव्हाण, क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते.
आरती अंकलीकरांच्या स्वरमंचावरील सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली
आरती अंकलीकर यांनी राग दुर्गामध्ये “सखी मोरी रुमझूम” ही झपतालातील बंदिश सादर करून शास्त्रीय गायनाची सुरुवात केली. या बंदिशीतील ‘रुमझूम’ या शब्दाप्रमाणेच स्वरांची रिमझिम पावसासारखी श्रोत्यांच्या मनावर अलगद बरसू लागली. त्यानंतर त्यांनी गायनाचे विविध राग सादर केले. या रागात रंगलेली “मोरा सैयाँ रे खेलंत होरी” ही तीनतालातील बंदिश सादर करताना स्वर आणि लयींचा बहार रसिकांना अनुभवायला मिळाला.
त्यानंतर त्यांनी सादर केलेली “बरसन लागी बदरिया” ही जणू स्वरांच्या ओल्या थेंबांनी सजलेली रचना श्रोत्यांच्या मनात रेंगाळून गेली. लयकारी आणि तानांच्या बहारदार गुंफणीत त्यांनी “नादब्रह्म परमेश्वर” या बंदिशीला वेगळेच स्वरमय रूप दिले. एकताल, आडाचौताल, झपताल आणि तीनताल अशा विविध तालांतून आरती अंकलीकर यांनी जणू सूरांची रेखाटण केली. “मी राधिका, मी प्रेमिका” या आत्मनिवेदनात्मक बंदिशीतून त्यांनी नारीत्वाची विविध रूपे प्रकट केली. त्यांच्या आवाजातील ताकद, षड्जामधून उमटणारी गहराई आणि सप्तकांमधील सहज विहार यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. गायनाच्या अखेरीस भैरवी गाताना त्यांनी टप्प्याच्या जलतरंगाने उपस्थितांना भारावून टाकले, तर “अवघा रंग एक झाला” या अभंगाने त्यांच्या कार्यक्रमाचा समारोप झाला.
आरती अंकलीकर यांना विभव खांडोळकर (तबला वादन), अभिनय रवंदे (हार्मोनियम वादन), शुभम उगले (पखवाज वादन), अनुराधा मांडलीक व जान्हवी गद्रे (तानपुरा वादन), विश्वजीत लोंढे (साऊंड रिदम) यांनी साथसंगत केली.
स्वरार्पणातून प्रकटले गुरुत्वाचे भक्तिपर्व - विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे सादरीकरण
महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी संगीत अकादमीतील विद्यार्थ्यांचे देखील सादरीकरण झाले. यामध्ये सुरुवातीला ऋषी दातीर, संग्राम सस्ते यांनी ताल तीनतालमध्ये कायदा, रेला, तुकडा आणि काही बंदिशी सादर केल्या. त्यांना लेहरा साथ अकादमीचा विद्यार्थी हरिदास सावंत यांनी केली. त्यानंतर नंदिनी सरीन यांच्या विद्यार्थिनी निर्झरा केदारे आणि आरोही गाडेकर यांनी विविध बंदिशी सादर केल्या. त्यांना हरिदास सावंत (हार्मोनियम वादन), मिनाक्षी पवार (तबला वादन) यांनी साथसंगत केली.
हार्मोनियम विभागाच्या विद्यार्थिनी कावेरी भावे आणि तनिशा शिंदे यांनी राग मधुवंतीमध्ये आलाप, जोड, झाला आणि तानांसहित गत सादर केली. निरंजन लवळेकर (तबला वादन) यांनी त्यांना साथसंगत केली.
शास्त्रीय गायक रामेश्वर डांगे यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग मधुवंतीमध्ये बडा ख्याल बंदिश सादर केली आणि 'बाजे मुरलिया' या अभंगाने त्यांच्या गायनाचा समारोप केला. त्यांना संतोष साळवे (तबला वादन), हरिभाऊ आसतकर (हार्मोनियम वादन) यांनी साथसंगत केली.
शास्त्रीय गायिका आणि संगीत अकादमीच्या शिक्षिका स्मिता देशमुख यांनी 'पिया मोरे आनत' आणि 'ओ गुनीयन मिल' बंदिश सादर केली. त्यानंतर 'ऐसे पंढरीचे स्थान' हा अभंग गात रसिकांची मने जिंकली. त्यांना ओजस रानडे (हार्मोनियम वादन), संतोष साळवे (तबला वादन), निर्झरा केदारे (तानपुरा वादन), विश्वजीत लोंढे (टाळ) यांनी साथसंगत केली.
त्यानंतर संगीत अकादमीचे शिक्षक मिलिंद दलाल यांनी सुरुवातीला गुरु स्तुती सादर करून रसिकांची मने जिंकली. 'जय दुर्गे दुर्गती परिहारीणी' हे दुर्गा स्तवन आणि 'मन हे राम रंगी रंगले' ही अभंगमाला त्यांनी सादर केली. त्यांना संतोष साळवे (तबला वादन), पवन झोडगे (पखवाज वादन) आणि विश्वजीत लोंढे (टाळ वादन) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्रीडा विभागाचे दत्तात्रेय दुधे, शीतल मारणे, राजेंद्र शिंदे, विशाल गायकवाड, संदेश बालघरे, सुप्रिया सुरगुडे, संगीत अकादमी पर्यवेक्षक अरुण कडूस, दीपक कन्हेरे, गोरख तिकोने, अनिल जगताप, बन्सी आटवे, बाळाराम शिंदे, सुनील ओहोळ, दीपक जगताप, संगीत शिक्षक समीर सूर्यवंशी, नंदिनी सरीन, वैजयंती भालेराव, स्मिता देशमुख, मिलिंद दलाल, संतोष साळवे, उमेश पुरोहित यांनी परिश्रम घेतले. विकास गायकांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर समीर सूर्यवंशी यांनी आभार मानले.
Aarti Ankalikar-Tikekar, Classical Music Concert, Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pandit Bhimsen Joshi Sangeet Academy, Music Festival, Akurdi Natyagriha, Indian Classical Music, Marathi Classical Singer
#AartiAnkalikar #ClassicalMusic #IndianClassical #PimpriChinchwad #MusicFestival #PanditBhimsenJoshi #SangeetAcademy #MarathiMusic #Concert #PuneEvents

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: