पिंपरी चिंचवड: भोसरी एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयातील सहायक अभियंता रामप्रसाद सुखदेव नरवडे याला २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्याच्यासोबत एका खाजगी व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०४/०६/२०२५ रोजी सकाळी १०:४० ते ११:३० वाजण्याच्या दरम्यान स्पाइन रोडवरील महावितरणच्या भोसरी उपविभाग-२ कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. मनेष शांताराम शेळके (वय ३९ वर्षे, रा. गट नं १९० मोई, ता. खेड, जि. पुणे) यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती.
सहायक अभियंता रामप्रसाद सुखदेव नरवडे (वर्ग २) याने तक्रारदाराकडे श्री मोहम्मद आरिफ खान यांच्या वतीने घरगुती विद्युत कनेक्शन मिळवून देण्यासाठी ३५,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २५,०००/- रुपये स्वतःसाठी व 'साहेबांसाठी' मागितले होते. सदरची लाच रक्कम शामलाल असोकन (वय ३५, रा. सिल्व्हर नाईन सोसायटी, ई विंग फ्लॅट नं ११०५, मोशी, पुणे) या खाजगी व्यक्तीने स्वीकारली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथील पोलीस निरीक्षक श्री प्रसाद लोणारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून रामप्रसाद नरवडे आणि शामलाल असोकन या दोघांनाही अटक केली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ७ अ अन्वये त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
- ---------------------------------------------------------------------------------------------------------#Corruption, #Bribery, #ACB, #MSEDCL, #PimpriChinchwad, #Arrest
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२५ ०४:३३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: