खेड, १४ जून २०२५ - कोकणातील लोटे औद्योगिक वसाहतीनजिक असगणी गावात प्रस्तावित असलेल्या कोका-कोला कंपनीच्या प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य न देण्याच्या विरोधात अजगणी गावातील ग्रामस्थांचा जनआक्रोश शिगेला पोहोचला आहे. ५ जून रोजी काढलेल्या शांततापूर्ण मूक मोर्चानंतर मात्र आठ तासांत पोलिसांनी २२ नामनिर्देशित आणि साडेतीनशे अज्ञात व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
अजगणी ग्रामपंचायतीच्या वतीने ८ मे २०२५ च्या ग्रामसभेच्या ठरावानुसार आयोजित करण्यात आलेल्या या मूक मोर्चात सुमारे साडेतीनशे ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. ग्रामपंचायत सदस्य प्रमोद चांदिवडे आणि सरपंच संजना बुरटे यांच्या नेतृत्वाखाली 'इंटरनॅशनल युनियन फॉर फूड वर्कर्स' (IUF) या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
आंदोलकांनी तोंडावर काळे पट्टे बांधून, हातात काळे झेंडे आणि फलक घेऊन असगणी ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरू होऊन औद्योगिक क्षेत्रातून शांततेत फिरून पुन्हा ग्रामपंचायतीसमोर मोर्चा संपवला. या वेळी पोलीस यंत्रणा उपस्थित असून, त्यांनी आवश्यक सहकार्यही केले होते.
या प्रकारानंतर आज ग्रामस्थांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. पत्रकार परिषदेत बोलताना प्रमोद चांदिवडे यांनी सांगितले की, "जर आमच्याकडून कायद्याचा भंग झाला होता तर त्याच ठिकाणी पोलिसांनी आम्हाला थांबवायला पाहिजे होते. परंतु त्यांनी सहकार्य केल्यानंतर आठ तासांनी गुन्हे दाखल करणे हे न्याय्य नाही." त्यांनी यासाठी कंपनी प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना समान जबाबदार ठरवले.
कोका-कोला प्रकल्पामुळे स्थानिकांमध्ये रोजगाराच्या संधींबाबत मोठी आशा निर्माण झाली होती. मात्र नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याने आणि बाहेरील लोकांना प्राधान्य दिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे प्रतिनिधी संजय आंब्रे यांनी सांगितले की, त्यांच्या संघटनेचे जगभरात २ कोटींपेक्षा जास्त सदस्य आहेत. कोका-कोला कंपनीने त्या देशाच्या कायद्याचे उल्लंघन केल्यास, त्यांच्या अटलांटा (अमेरिका) येथील मुख्यालयात ते प्रकरण दाखल करता येते आणि ओईसीडी गाईडलाईन्सप्रमाणे दाद मागता येते. जरूर भासल्यास आम्ही त्या मार्गाचाही अवलंब करू. आंब्रे पुढे म्हणाले, कंपनीचे काम सुरू होऊन दोन वर्षे झाली तरी केवळ ६० ते ६५ लोकांची थेट भरती केली असून, त्यातही स्थानिकांना डावलले जात आहे.
स्थानिक रहिवाशांनी व्यथा व्यक्त करताना सांगितले, "डिप्लोमा, आयटीआय, बी.एससी., एम.एससी., बी.टेक झालेले अनेक पात्र उमेदवार गावात असतानाही कंपनी त्यांना रोजगार देत नाही. आमच्या वडिलांनी एमआयडीसीला जमिनी दिल्या, आता शेतीसाठीही जागा नाही, मग तरुणांनी बेरोजगार फिरायचे का?"
या प्रकरणी कोकणातील एकही लोकप्रतिनिधी, उद्योगमंत्री किंवा पालकमंत्र्यांनी प्रतिक्रिया व्यक्त न केल्याबद्दल ग्रामस्थांनी खेद व्यक्त केला आहे. चांदिवडे यांनी स्पष्ट केले की, "हा लढा इथेच संपलेला नाही, ही फक्त नाटकाची सुरुवात आहे. जोपर्यंत स्थानिक युवक-युवतींना नोकऱ्या मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील." पुढे साखळी उपोषण, बाईक रॅली आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
Industrial Dispute, Employment Rights, Coca-Cola Protest, Local Employment, Maharashtra Industry, Labor Movement, Rural Protest, Corporate Responsibility, Konkan Industrial Development
#AjganiProtest #CocaColaDispute #LocalEmployment #KonkanIndustry #LaborRights #RuralProtest #MaharashtraIndustry #EmploymentDispute #IndustrialConflict #WorkersRights #CorporateResponsibility #LocalJobs
Reviewed by ANN news network
on
६/१४/२०२५ ०८:४०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: