दुबईमध्ये मराठी प्रोफेशनल्सच्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ कार्यक्रमात घुमला एकतेचा नारा
पिंपरी : "महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी १०५ हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले आहे. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि आज महाराष्ट्र कृषी, शिक्षण, उद्योग यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये एक प्रगतिशील राज्य म्हणून ओळखला जातो. राज्याच्या या सर्वसमावेशक विकासात देशात आणि परदेशात पसरलेल्या प्रत्येक मराठी माणसाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. उद्योग आणि रोजगाराच्या निमित्ताने दुबईमध्ये स्थायिक झालेला प्रत्येक मराठी माणूस हा महाराष्ट्राचा ब्रँड अँबेसिडर आहे," असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे नियामक मंडळ सदस्य सचिन इटकर यांनी केले.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने दुबई येथे रविवारी (दि. ४ मे २०२५) मराठी प्रोफेशनल्स या संस्थेने ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात दुबई जल आणि विद्युत विभागाचे व्यवस्थापक तसेच दुबई प्रोफेशनल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि मूळचे बेळगावचे असलेले सोमनाथ पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे मार्केटिंग प्रमुख जमीर मुल्ला, रवींद्र देशमुख, इंद्रजीत शिंदे, अतुल विसपुते, रवींद्र देसाई, नारायण तिवारी, सनी सुतार, निखिल जोशी, चंद्रशेखर जाधव, शिवाजी पाटील, विठोबा अहेर, अमित भोसले, शेखर दिवाडकर, नितीन जाधव, सदानंद भोयर, विजय कदम आणि मेनका जोशी यांच्यासह दुबईमधील अनेक मराठी अधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन इटकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या कृषी, शिक्षण, उद्योग, व्यापार, सहकार, साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान आणि आरोग्य यांसारख्या विविध क्षेत्रांतील प्रगतीमध्ये सर्व मराठी लोकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शिक्षण क्षेत्रात आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेण्यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे साते आणि वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ सज्ज आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेसोबतच येथील लोकसंस्कृती आणि समृद्ध वारसा स्थानिक मराठी नागरिकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून दर्शविला. महाराष्ट्र गीताबरोबरच यूएई आणि भारताचे राष्ट्रगीत सादर करून एकात्मतेचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात २०० पेक्षा जास्त कुटुंबांनी सक्रिय सहभाग घेतला. युवती आणि महिलांनी ढोल-ताशांच्या गजरात सर्वांचे स्वागत केले. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर भजन, लोकगीते, कोळीगीते आणि लावणी यांसारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगतदार प्रस्तुती झाली.
सोमनाथ पाटील यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, ज्या गावातून आपण येथे आलो आहोत, त्या गावातील तरुणांचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. यापुढे दुबईमध्ये दरवर्षी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल आणि मराठी प्रोफेशनल्स व पिंपरी चिंचवड विद्यापीठ हे मराठी माणसाच्या प्रगतीसाठी एक मजबूत पूल म्हणून कार्य करेल.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक अजिंक्य काळभोर आणि नरेंद्र लांडगे यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ऑनलाइन माध्यमातून दिल्या.
...................................
#MarathiInDubai
#JaiJaiMaharashtraMajha
#SachinItkar
#MaharashtraDay
#DubaiEvent
#MarathiCulture
#PimpriChinchwadUniversity

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: