भारूड म्हणजे बहुरूढींचे दर्शन: ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू
पिंपरी (प्रतिनिधी) - 'भारूड म्हणजे बहुरूढींचे दर्शन होय!' असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन भारुडसम्राट ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू यांनी केले. जय भवानी तरुण मंडळ आयोजित शिव - फुले - शाहू - आंबेडकर - लोकमान्य व्याख्यानमालेतील अंतिम पुष्प गुंफताना ते बोलत होते. सोमवार, दिनांक १२ मे २०२५ रोजी श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे हा कार्यक्रम पार पडला.
'अरे अरे माणसा तू कधी होशील रे माणूस? जगण्याचे अंतिम सत्य!' या विषयावर आपले विचार व्यक्त करताना ह. भ. प. राजगुरू यांनी बहुरंगी आणि बहूढंगी भारुडांचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या विनोदी शैलीतून त्यांनी श्रोत्यांना हसवत हसवत जीवनातील अंतिम सत्याकडे डोळसपणे पाहण्यास प्रवृत्त केले.
यावेळी विधानपरिषद आमदार उमा खापरे, माजी नगरसेविका ॲड. वैशाली काळभोर, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, अजित गव्हाणे, शीतल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, महेश कुलकर्णी, राजाभाऊ गोलांडे, रवींद्र नामदे, विशाल काळभोर, नेताजी शिंदे, संदीप म्हेत्रे, नामदेव ढाके, अनिल कुंकूलोळ, आणि मुख्य संयोजक मारुती भापकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रमोद कुटे यांनी आपल्या मनोगतात जय भवानी तरुण मंडळाच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, 'समाजात स्वार्थाशिवाय काम करणारे कार्यकर्ते दुर्मिळ झाले आहेत, मात्र जय भवानी तरुण मंडळ गेल्या पंचवीस वर्षांपासून अविरतपणे सामाजिक कार्य करत आहे. या मंडळाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत आजवर अनेक विचारवंतांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.'
ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू यांनी एकनाथ महाराजांच्या भारुडांविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, 'लोकांना मनोरंजन आणि लोकशिक्षणाच्या माध्यमातून परमार्थाकडे वळवण्यासाठी संत एकनाथांनी भारुडे रचली. त्यामुळे भारुडांमधील केवळ शाब्दिक अर्थ न पाहता त्याचा लाक्षणिक अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. भगवंताने दिलेला मानवी देह अनमोल आहे आणि त्याचा उपयोग चांगल्या कामांसाठी केला पाहिजे. मांसाहार व मद्यपान हे आसुरी भोजन असून कोणतेही देव-देवता बकरे किंवा कोंबडे मागत नाहीत. नवस करणे किंवा अंगात येणे यांसारख्या अंधश्रद्धांपासून दूर राहिले पाहिजे. देव केवळ निरपेक्ष भक्तीचा भुकेला असतो, असे अनेक संतांनी सांगितले आहे.'
या कार्यक्रमात लक्ष्मणमहाराज यांनी आई भवानी, गोंधळी, बोहारीण, बहुरूपी अशा विविध वेशभूषा करून श्रोत्यांचे मनोरंजन केले आणि प्रभावीपणे समाजप्रबोधनही केले. किसन साळुंखे, देवा भिसे, विशाल दराडे, प्रसाद राजगुरू आणि घाडगेमहाराज यांनी ज्ञानेश्वरमाउली, तुकोबाराय, एकनाथमहाराज, कबीर, जनाबाई यांच्या भक्तिरचनांचे सुंदर गायन करून साथसंगत केली.
जय भवानी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल शिंपले यांनी केले आणि मारुती भापकर यांनी आभार मानले.
------------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: