
उरण : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकारने बुधवार, ७ मे २०२५ रोजी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागली. भारतीय सैन्य दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ही कारवाई केली. भारताच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आले होते, जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्याचा कट रचला गेला आणि त्याची अंमलबजावणी झाली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांना लक्ष्य केले. या कृतीचे सर्व भारतीयांनी समर्थन केले असून, भारताला दहशतवादविरोधी कारवाईसाठी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. उरणमधील नागरिकांनीही दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला पूर्ण पाठिंबा व समर्थन दिल्याचे चित्र उरणमध्ये दिसून आले. उरणकरांनी व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्याचे आवाहन केले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) ने भारतीय सैनिकांच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला जाहीर पाठिंबा दिला आहे. तालुकाध्यक्ष परीक्षित प्रकाश ठाकूर यांनी देशाचे कणखर व उत्तम नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे व कार्याचे स्वागत करत त्यांचे आभार मानले आहेत. दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे, जेणेकरून पुन्हा कोणी भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही. भारतीय सेनेने दहशतवाद्यांच्या कृत्यांना योग्य प्रत्युत्तर द्यावे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. सर्व भारतीयांनी युद्धजन्य परिस्थितीत भारताच्या पाठीशी एकजुटीने उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट)चे उरण तालुकाध्यक्ष परीक्षित प्रकाश ठाकूर यांनी केले आहे.
........................................
#OperationSindoor
#UranNCP
#AjitPawar
#IndianArmy
#TerrorismResponse
#PahalgamAttack
#IndiaFightsBack
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: