फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर प्रायोगिक प्रकल्प सुरू
पुणे, दि. २८ (प्रतिनिधी): पुणे शहरात वाहतूक नियमनामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या संकल्पनेतून वाहतूक शाखेने हा महत्त्वपूर्ण बदल केला असून, याची सुरुवात फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे.
या नवीन प्रणालीद्वारे, फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एआय आधारित कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नो पार्किंगमध्ये उभी केलेली वाहने, तसेच तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी डबल पार्किंगची वाहने आणि इतर वाहतूक नियम मोडणारी वाहने शोधली जाणार आहेत. यानंतर सीसीटीव्ही चलन प्रणालीद्वारे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
पुणे शहरात पहिल्यांदाच एआय आधारित कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहनांच्या नंबर प्लेटची तपासणी करून त्यांनी केलेल्या वाहतूक नियमांचे उल्लंघन त्वरित शोधले जाईल. या प्रणालीची माहिती वाहनचालकांना व्हावी यासाठी फर्ग्युसन कॉलेज रोडवर स्क्रीनच्या माध्यमातून प्रदर्शनही केले जाणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उद्देश वाहतूक नियमनासोबतच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे.
या प्रायोगिक प्रकल्पाचे विश्लेषण केल्यानंतर, वाहतूक नियमनाचे प्रभावी अंमलबजावणीसाठी भविष्यात पुणे शहरातील विविध महत्त्वाच्या रस्त्यांवर या ‘ए.आय. आधारित वाहतूक उल्लंघन शोध व अंमलबजावणी प्रणाली’चा वापर केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी केले आहे.
या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त (अतिरिक्त कार्यभार) डॉ. संदीप भाजीभाकरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच, SENSEN AI कंपनीचे विजय खुस्पे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------
- #PuneTrafficPolice
- #ArtificialIntelligence
- #TrafficManagement
- #TrafficRules
- #NoParkingViolation
- #DoubleParking
- #FergusonCollegeRoad
- #AICamera
- #SmartPolicing
- #PuneCity
Reviewed by ANN news network
on
५/२९/२०२५ ०७:१८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: