पुणे, प्रतिनिधी: २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या अडीच वर्षांच्या काळात अनेक भ्रष्टाचार झाले, असे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी व्यक्त केले. लेखक विनायक आंबेकर यांच्या 'किंगमेकर क्रॉनिकल - वसुली व घोटाळ्यांचे पर्व' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
माधव भंडारी म्हणाले, "२०१९ च्या निवडणुकीत जनतेने युतीला स्पष्ट जनादेश दिला होता. मात्र, शिवसेनेने जनतेचा विश्वासघात करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी सरकार स्थापन केले. या सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ राज्यासाठी दुर्दैवी ठरला. कोरोना काळात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आणि याच काळात अनेक भ्रष्टाचारांची मालिका सुरू झाली."
विनायक आंबेकर यांच्या पुस्तकाचे कौतुक करताना भंडारी म्हणाले, "राजकीय विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन मराठीत फार कमी आढळते. विनायक आंबेकर यांचे लेखन अभ्यासपूर्ण आहे. त्यांनी या पुस्तकात आघाडी सरकारच्या काळातील अनेक दडलेल्या गोष्टी, हितसंबंध आणि अंतस्थ हेतू उघड करण्याचा प्रयत्न केला आहे."
लेखक विनायक आंबेकर यांनी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले, "राजकारणातील अनेक नेते अर्वाच्च भाषेत बोलतात. ते असे का बोलतात आणि जनतेपासून काय लपवू इच्छितात, हे जनतेला समजणे आवश्यक आहे. कोरोना काळ आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातील घोटाळ्यांची साखळी या पुस्तकातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात आघाडी सरकारच्या काळातील घोटाळ्यांची वस्तुस्थिती आणि त्यामागील भूमिका मांडली आहे. एका व्यक्तीला असा भ्रम झाला आहे की, ते जे बोलतात तेच सत्य आहे, परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे, हे दाखवणे हा माझा उद्देश आहे."
----------------------------------------------------------------------------------------
#MaharashtraPolitics #Corruption #BJP #MVA #BookRelease #Pune #MadhavBhandari #VinayakAmbekar
Reviewed by ANN news network
on
५/११/२०२५ ०८:३०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: