दापोली, १० मे (प्रतिनिधी): पुणे येथून आंजर्ले येथे पर्यटनासाठी आलेल्या एका २२ वर्षीय महिला पर्यटकाचा समुद्रात पोहत असताना बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे आंजर्ले परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे शहरातील विश्रांतवाडी येथील १२ जणांचा ग्रुप आज पहाटे चार वाजता पर्यटनासाठी दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे रवाना झाला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते आंजर्लेला पोहोचले. स्थानिक रिसॉर्टवर त्यांनी नाश्ता केला आणि दुपारी सुमारास समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेले.
यावेळी पोहत असताना अचानक एक मोठी लाट आली आणि या लाटेत तन्वी निलेश पारखी (वय २२) ही तरुणी दिसेनाशी झाली. त्यावेळी तिच्यासोबत असलेल्या मित्रांनी तात्काळ ग्रामस्थांना माहिती दिली. तत्काळ प्रतिसाद देत ग्रामस्थांनी तिला समुद्रातून बाहेर काढले, मात्र तेव्हा ती बेशुद्धावस्थेत होती.
तिला तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
दापोली पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्याचे काम सुरू असून, अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या आंजर्ले परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना समुद्रात पोहताना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
--------------
#DapoliNews
#AnjarleBeach
#PuneTourist
#DrowningIncident
#MaharashtraTourism
#BeachSafety
#TanviParkhi
#MarathiNews
#LocalNews
#PCMCUpdates
Reviewed by ANN news network
on
५/१०/२०२५ ११:०४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: