पुणे (प्रतिनिधी) - महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या (एम.सी.ई.एस.) आझम कॅम्पसमधील तीन शाळांनी दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल, अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल आणि एम.सी.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे.
एम.सी.ई.एस.चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सचिव प्रा. इरफान शेख, शाळा समिती अध्यक्ष हाजी कदीर कुरेशी, एस. ए. इनामदार, अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलचे मुख्याध्यापक राज मुजावर, अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्या सौ. रोशन आरा शेख आणि एम.सी.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका असफिया अन्सारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलच्या उर्दू माध्यमाचा निकाल १०० टक्के लागला आहे. या माध्यमात खान मो. कोनेन जावेद याने ८५.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला, तर सुफियान अहमद शेख ८३.२० टक्के गुणांसह द्वितीय आणि पटेल मोहम्मद तौहीद अलताफ ८०.८० टक्के गुणांसह तृतीय आला. इंग्रजी माध्यमाचा निकाल ९९.०२ टक्के लागला असून, शाह गुलाबशाह शमसेआलम याने ९४.४० टक्के गुण मिळवून प्रथम स्थान प्राप्त केले. सिद्दीकी अरबाज रशीद ९०.४० टक्क्यांसह द्वितीय आणि मुल्ला खालिद अहमद झाहीद हुसेन ८७.४० टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर राहिला, अशी माहिती मुख्याध्यापक राज मुजावर यांनी दिली.
अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलचा निकालही १०० टक्के लागला आहे. या शाळेत कु. पठाण मुबस्सेरा शमशेर हिने ९४.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर कु. शेख अलीजा इम्तियाज अहमद ९३.८० टक्क्यांसह दुसरी आणि कु. शेख उम्मेहनी जुबेर ९३.६० टक्क्यांसह तिसरी आली. या शाळेतील एकूण २० विद्यार्थिनींनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले असून, १६१ विद्यार्थिनी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्या आहेत, असे मुख्याध्यापिका सौ. रोशनआरा शेख यांनी सांगितले.
एम.सी.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल ९३.९० टक्के लागला आहे. या शाळेत तंबोली झैनब झाहीद आणि कुरेशी मदिहा नईम यांनी प्रत्येकी ९१.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक विभागून घेतला. मेमन राबिया रेहान हिने ८९.६० टक्क्यांसह दुसरा, तर तंबोली आयेशा शाहनवाजने ८९ टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला, अशी माहिती मुख्याध्यापिका असफिया अन्सारी यांनी दिली.
---------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: