मुंबई : सर्वांना साथ, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचा विकास या ब्रीदवाक्याचे पालन करणाऱ्या केंद्र आणि राज्यांमधील भाजपाप्रणित सरकारांनी समाज आणि राष्ट्राला सुरक्षा दिली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुती सरकारलाच मतदार निवडून देणार असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. यावेळी भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आणि प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.
डॉ. सत्यपाल सिंह यांनी सांगितले की, भाजपाप्रणित सरकारच्या गेल्या साडेदहा वर्षांच्या कार्यकाळात जम्मू-काश्मीरमधील घटना वगळता देशात कोठेही बॉम्बस्फोटांच्या घटना घडल्या नाहीत. नक्षलवाद 80 टक्के आटोक्यात आला आहे. कठोर कारवाईमुळे गुन्हेगारी नियंत्रणात आली. हेच महाराष्ट्रातही घडले. पोलिस दल सक्षम करण्यासाठी 20,000 पोलिस कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली, आठ हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आले. न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) प्रयोगशाळांची संख्या वाढवली आणि जलदगती न्यायालयांची संख्याही वाढवली. सायबर गुन्हे रोखण्यासाठी 850 कोटींचे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व प्रयत्नांमुळे गेल्या दोन वर्षांत आलेल्या विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 58 टक्के गुंतवणूक फक्त महाराष्ट्रात आहे. त्यामुळे येथील जनता सुरक्षा आणि समृद्धी देणारे भाजपा महायुतीचे सरकार निवडून आणेल.
डॉ. सत्यपाल सिंह यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून कुठेही भूकबळी गेले नसल्याचे सांगितले. 80 कोटी जनतेला मोफत अन्न पुरवले गेले, गरिबांना मोफत घरे मिळाली, लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली. मागास समाजासाठी प्रगतीची दारे उघडण्याचे काम केले गेले. गॅस जोडणी, कागदपत्रांवर महिलांच्या नावाची नोंद करण्याला प्राधान्य दिले. भाजपाने प्रत्येक समुदायाला राजकारणात स्थान दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची यशस्वी सुटका करण्यात आली. परराष्ट्र धोरणामुळे भारतीय पासपोर्ट आणि तिरंग्याचा सन्मान जगभरात वाढला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर टीका करत डॉ. सत्यपाल सिंह म्हणाले की, काँग्रेसने देशवासीयांच्या आस्था आणि संस्कृतीची थट्टा केली आहे. श्रीराम अस्तित्वातच नव्हते, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल करून काँग्रेसने धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तसेच, सोमनाथ मंदिराच्या भेटीला विरोध करत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना पत्र पाठवले होते. याच्या उलट भाजप सरकारने तीर्थक्षेत्रांचा विकास करत देशाच्या संस्कृतीची जपणूक केली आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०५/२०२४ ०५:३८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: