"दंडवत की शड्डू? मोशीकरांनी करावी निवड" - सुलभा उबाळे

 


 "निष्ठावंत शिवसैनिक घडवतील नवा इतिहास" - अजित गव्हाणे

मोशी : "मोशीकरांनी आता ठरवायचे आहे - श्री नागेश्वर महाराजांना दंडवत घालून आशीर्वाद मागणारे अजित गव्हाणे की मंदिरासमोर शड्डू ठोकणारी मग्रूर प्रवृत्ती," असे आव्हान शिवसेनेच्या (उबाळे गट) पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी दिले.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचार दौऱ्यात श्री नागेश्वर महाराज मंदिरात त्यांनी केलेल्या दर्शनानंतर उबाळे बोलत होत्या. "मोशीकरांच्या पाठिंब्याने विजय निश्चित होतो, आणि गव्हाणे यांच्या पाठीशी मोशीकर एकवटले आहेत," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महापालिकेतील कारभाराची तीव्र टीका करताना उबाळे म्हणाल्या, "गेल्या दहा वर्षांत सर्व कायदे पायदळी तुडवून कारभार सुरू आहे. पूर्वी विलास लांडे आमदार असताना विरोधकांना बोलण्याची मुभा होती, काम करण्याचे स्वातंत्र्य होते. आता हा मुद्दाच बाजूला पडला असून महापालिकेत भ्रष्टाचाराची बजबजपुरी निर्माण झाली आहे."

"विजयाचे शिल्पकार माजी आमदार विलास लांडे आपल्यासोबत आहेत. वस्तादाची एंट्री शेवटी होते, पण त्या एंट्रीने विजय दृष्टीक्षेपात येतो," असे नमूद करत उबाळे यांनी २० नोव्हेंबरला 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.

अजित गव्हाणे यांनी या वेळी विश्वास व्यक्त केला की, "माजी आमदार विलास लांडे यांच्यासारखे वस्ताद आपल्यासोबत असून निष्ठावंत शिवसैनिक महाविकास आघाडीसाठी इतिहास घडवतील."

यावेळी माजी नगरसेवक बबन बोराटे, धनंजय आल्हाट, माजी नगरसेविका विनया तापकीर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

"दंडवत की शड्डू? मोशीकरांनी करावी निवड" - सुलभा उबाळे "दंडवत की शड्डू? मोशीकरांनी करावी निवड" - सुलभा उबाळे Reviewed by ANN news network on ११/०५/२०२४ ०५:३२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".