कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा निषेध; दूतावासासमोर आंदोलनाचा इशारा
पुणे : कॅनडाच्या ब्रेम्प्टन भागातील हिंदू मंदिरावर 'सीख फॉर जस्टीस' संघटना आणि खलिस्तानवादी कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती समितीने कॅनडा सरकारविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. हल्लेखोरांवर कारवाई न झाल्यास भारतातील कॅनेडियन दूतावासासमोर निदर्शने करण्याचा इशारा समितीने दिला आहे.
भारतीय उच्चायुक्तांच्या मंदिर भेटीदरम्यान झालेल्या या हल्ल्यामुळे कॅनडा सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हिंदु जनजागृती समितीच्या म्हणण्यानुसार, पूर्वनियोजित भेटीची माहिती असूनही सुरक्षा व्यवस्था न करणे हे कॅनडा सरकारच्या मुकसंमतीचे द्योतक आहे.
खलिस्तानी नेते हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येनंतर कॅनडामध्ये हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीने भारत सरकारकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत - आंतरराष्ट्रीय स्तरावर कॅनडा सरकारवर दबाव आणणे आणि हल्लेखोर संघटनांच्या भारतातील समर्थकांवर कठोर कारवाई करणे.
"कॅनडातील हिंदू मंदिरांवरील वारंवार होणारे हल्ले थांबवण्यात कॅनडा सरकार अपयशी ठरले आहे. हल्लेखोरांना पाठीशी घालण्याचे धोरण बदलले नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करू," असा इशारा समितीने दिला आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०५/२०२४ ०५:११:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: