मुंबई: "निवडणुकीच्या तोंडावर खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडण्याची काँग्रेसला सवय आहे. मात्र, काँग्रेसने दिलेली कोणतीही आश्वासने त्यांच्या राज्यांमध्ये पाळली नसल्यामुळे महाविनाश आघाडीवर विश्वास ठेवणे चुकीचे आहे," असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यातील मतदारांना केले. भाजपा मीडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आणि प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. वक्फ संबंधित मुद्द्यावर महाविकास आघाडीकडून स्पष्ट भूमिका घेतली जावी, असेही जावडेकर यांनी सांगितले.
प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर टीका करताना हिमाचल प्रदेशात दिलेल्या आश्वासनांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, "काँग्रेसने हिमाचल प्रदेशात ३०० युनिट्स मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते, पण तिथे वीजच नाही. बेरोजगारांना एक लाख नोकऱ्या देण्याचे कबूल केले होते, पण आता तिथे नोकर भरतीच बंद आहे. जुनी पेन्शन देण्याचे वचन दिले, पण पगारच वेळेवर मिळत नाहीत. कर्नाटकमध्येही काँग्रेसच्या घोषणांची अशीच अवस्था आहे. त्यांनी दुधाला अनुदान देण्याचे सांगितले, पण प्रत्यक्षात दुधाचे दर वाढवले. पाण्याची स्थिती सुधारण्याचे वचन दिले होते, पण आता तिथे टँकर माफियांचे राज्य सुरू आहे."
काँग्रेसच्या संविधान आणि आरक्षणासंदर्भातील प्रचारावर टीका करताना जावडेकर म्हणाले, "१९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात काँग्रेसनेच संविधानाचे उल्लंघन केले. संविधानाच्या तोडफोडीच्या विरोधात जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संघर्ष केला होता. आणीबाणीला विरोध केल्याबद्दल काँग्रेसने एक लाख २० हजार लोकांना तुरुंगात टाकले, ज्यात ८० हजार संघ परिवारातील होते."
वक्फ बोर्डासंबंधी बोलताना त्यांनी नमूद केले की, "वक्फ बोर्डाला देण्यात आलेल्या अधिकारांमुळे त्यावर आक्षेप घेण्यात येत आहेत. वक्फ बोर्ड ज्या जमिनीवर दावा करतो, ती जमीन त्यांचीच होते आणि त्या प्रकरणात न्यायालयात दाद मागता येत नाही; फक्त वक्फ बोर्डाच्या लवादासमोर दाद मागावी लागते. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानेही यावर नाराजी व्यक्त केली आहे. केरळमध्ये वक्फ बोर्डाने ६०० ख्रिस्ती कुटुंबांना घरे रिकामी करण्याची नोटीस दिली आहे. अशा प्रकारच्या वक्फला साथ देणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीतील पक्षांनी यावर विचार करावा," असेही जावडेकर यांनी यावेळी सांगितले.
Reviewed by ANN news network
on
११/०४/२०२४ ०५:५६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: